रशियन ‘लेवियाथान’ चित्रपटाला सुवर्ण मयूर

0
104
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते विशेष ज्युरी पुरस्कार स्वीकारताना ‘एक हजाराची नोट’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीहरी साठे पहिल्या छायाचित्रात दिसत आहेत. तर सुवर्ण मयूर पुरस्कार विजेत्या रशियन चित्रपट ‘लेवियाथान’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना पुरस्कार प्रदान करताना राज्यपाल मृदुला सिन्हा. बाजूस अभिनेत्री वहिदा रेहमान.

इफ्फीचा शानदार समारोप : ‘एक हजाराची नोट’ला विशेष ज्युरी पुरस्कार
बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित ४५व्या इफ्फीचा एका शानदार समारंभात समारोप झाला. उत्कृष्ट चित्रपटासाठी असलेला सुवर्ण मयुर पुरस्कार ऍण्ड्री झ्वाझिनसेव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लेवियाथान’ या रशियन चित्रपटाला प्राप्त झाला. तर रौप्य मयुर पुरस्कार ‘धी किंडरगार्टन टिचर’ या नादाव लेपिड यानी दिग्दर्शित केलेल्या इस्रायली चित्रपटाला प्राप्त झाला. तर मराठी दिग्दर्शक श्रीहरी साठे यांच्या ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाला स्पेशल ज्युरी पुरस्कार प्राप्त झाला. तसेच या चित्रपटाला शतक महोत्सवी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.उत्कृष्ठ अभिनेत्यासाठीचा पुरस्कार ‘लेवियाथान’ या चित्रपटात नायकाची भूमिका केलेला अभिनेता ऍलेक्सी सेरेब्रायकोव याला व शोतेबेर शोबी या बंगाली चित्रपटात नायकाची भूमिका केलेला बुटका अभिनेता दुलाल सरकार याना मिळाला.
उत्कृष्ठ अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार आलिना रुद्रिग्ज हिला ‘बिहेव्हियर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तर सेरिट जेरी हिला ‘धी किंडरगार्टन टिचर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला.
सुप्रसिध्द चिनी दिग्दर्शक वॉंग कारवाय यांचा यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विजेत्यांना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धन सिंह राठोड, नाना पाटेकर, वहिदा रेहमान, रमेश सिप्पी, प्रमुख पाहुणे जयराम सुब्रमण्यम् आदी हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
चित्रपट जतनासाठी ६०० कोटी खर्चणार
यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड म्हणाले की भारतात चित्रपटांना एक वेगळेच स्थान आहे. युवा वर्गाला तर चित्रपट या माध्यमाचे प्रचंड वेड असून शेकडो युवक-युवती अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी मुंबईला जात असल्याचे ते म्हणाले. भारतातील महत्त्वाच्या अशा ११०० चित्रपटांची जपणूक करण्यासाठी ६०० कोटी रु. खर्च करण्यात येणार आहेत. रशियन लेवियाथान चित्रपटाला सुवर्ण मयूर
शिवाय चित्रपटविषयक एक वस्तुसंग्रहालयही स्थापन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
महोत्सव यशस्वी : पार्सेकर
यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यंदाचा महोत्सव कधी नव्हे एवढा यशस्वी झाल्याचे सांगितले. पुढील वर्षी तो यापेक्षा जास्त चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले चीनी दिग्दर्शक वॉंग कार वाय यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री रिचा चड्डा यांनी केले.
यावेळी ईशान्य भारतातील लोकनृत्याचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक शंकर मोहन यानी आभार मानले.
समारोप सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान, जॅकी श्राफ, नाना पाटेकर, मनोज वाजपेयी, तनुश्री दत्ता, दिव्या दत्ता आदी बॉलिवूडमधील कलाकार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जयराम सुब्रमण्यम याना समारोप सोहळ्यात केवळ पुरस्कार प्राप्त एका कलाकाराना पुरस्कार देण्यापुरतेच मंचावर नेण्यात आले.

पुरस्कार विजेते
उत्कृष्ट अभिनेता : ऍलेक्सी सेरे ब्रायकोव (लेवियाथान) व दुलाल सरकार (शोतेबेर शोबी)
उत्कृष्ट अभिनेत्री : आलिना रुद्रिग्ज (बिहेव्हियर) व सेरेटी लेरी (धी किंडर गार्टन)
रौप्य मयूर- धी किंडरगार्टन टिचर (इस्रायली)
जीवन गौरव – चिनी दिग्दर्शक वॉंग कार वाय