पणजी पोटनिवडणुकीची जबाबदारी नावतींकडे देऊ नये :  कॉंग्रेस

0
84

गोव्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी चौकशी चालू असताना पणजीच्या पोटनिवडणुकीच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. नावती हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला व गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षपाती पद्धतीने काम केले होते असा दावा केला. भाजपने श्रीलंकेतील निवडणुकीसाठीही त्यांना पाठवल्याचे ते म्हणाले. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी चौकशी चालू असून उद्या जर ते दोषी असल्याचे आढळून आले तर सरकार काय करील, असा प्रश्‍न करून पणजी पोटनिवडणुकांची जबाबदारी त्यांना देऊ नका, अशी सूचना कवठणकर यांनी पत्रकार परिषदेतून केली.