पणजीत दिवसाढवळ्या सुरीहल्ल्यात एक जखमी

0
101

जॉल राज पन्नीर या पर्वरी येथील व्यक्तीवर रविवारी सकाळी पणजीत नॅशनल क्लबजवळ सुरीहल्ला करून त्याला भोसकण्याची घटना घडली.
पणजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पन्नीर हे आपल्या नातेवाईकांसह पणजीत खरेदीसाठी आले होते. खरेदी करून ते पीटर इंग्लंड शोरूमसमोरून आपली मेव्हुणी व अन्य नातेवाईकांसह चालत जात असताना अक्रम कुरैशी या भाटले येथील युवकाने त्याच्या मेव्हुणीच्या पाठीवर हात टाकून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पन्नीर यांनी त्याबाबत जाब विचारली असता संशयित आरोपीने क्षणाचाही विचार न करता त्याला चाकूने भोसले. आरडाओरड झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन संशयित आरोपीला पकडले व पन्नीर यांची सुटका केली.
अक्रम कुरैशी याला पणजी पोलिसांनी अटक केली असून जॉल राज पन्नीर याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. पणजी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.