श्रीनगर : दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद; १५ जखमी

0
72

येथे दहशतवाद्यांनी ग्रेनेडद्वारे पोलिसांच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून १५ पोलीस जखमी झाले आहेत. जुन्या श्रीनगरमधील नौहटा भागात काल सायंकाळी सातच्या सुमारास हा हल्ला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशरी – चेनानी या बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर हा हल्ला झाला. पंतप्रधान मोदी येणार म्हणून श्रीनगर बंदची हाक फुटीरवाद्यांनी दिली होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण नौहटा भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन अधिकारी व १४ पोलीसही जखमी झाले. त्यातील गंभीर जखमी झालेला शिपाई शमीम अहमद या पोलिसाला वीरमरण आल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. या हल्ल्यानंतर सर्व जखमींना तातडीने जवळच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नौहटातील गंजबक्स पार्कच्या समोरच दहशतवाद्यांनी पोलिसांच्या तुकडीवर हल्ला चढवला. दिवसभराचे काम आटोपून पोलीस परत असताना दहशतवाद्यांनी हल्ला चढवल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी ग्रेनेड डागण्याबरोबरच काही दहशतवाद्यांनी पोलिसांवर दगडफेक करून लक्ष्य केल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.