पणजीतील शिंपी व्यवसाय

0
31
  • शरत्चंद्र देशप्रभू

गोव्यात शिंपी व्यवसायाला फार मोठा वारसा नसला तरी कालपरत्वे काही वैशिष्ट्ये अधोरेखित होतात. मुक्तीपूर्व काळात घरोघरी गरजेपुरते शिवणकाम व्हायचे. या विरळ लोकसंख्या असलेल्या राज्यात पूर्णवेळ शिंपीव्यवसाय म्हणजे तारेवरची कसरतच. तरी पूर्णवेळ शिंपी व्यवसायावर गुजराण करणाऱ्या व्यक्ती दृष्टीस पडत.

गोव्यात शिंपी व्यवसायाला फार मोठा वारसा नसला तरी या व्यवसायातली काही वैशिष्ट्ये कालपरत्वे आपोआप अधोरेखित होतात. मुक्तीपूर्व काळात घरोघरी गरजेपुरते शिवणकाम व्हायचे. व्यावसायिकदृष्ट्या अर्धा वेळ किंवा फावल्या वेळात केलेले शिंपीकाम अस्तित्वात होते. या पार्श्वभूमीवर या विरळ लोकसंख्या असलेल्या राज्यात पूर्णवेळ शिंपीव्यवसाय म्हणजे तारेवरची कसरतच. तरी बोटांवर मोजण्यापुरते का होईना, पूर्णवेळ शिंपी व्यवसायावर आपली व कुटुंबाची गुजराण करणाऱ्या व्यक्ती दृष्टीस पडत. हातशिलाईवरून छोटे हाताने चालवायचे यंत्र आले. हे खाली बैठक मारून चालवावे लागे. शिवणीपुरते छोटे चाक चालवणे. चाक फिरवत असताना सुईच्या खाली कापड सरकवावे लागे. यासाठी उपजत तसेच कमावलेल्या कौशल्याची गरज भासे. नंतर पायपेटीसारखी शिलाई यंत्रे आली. यामुळे दोन्ही हात मोकळे झाले. कामाची गती वाढली, सुलभता आली.

मुक्तीपूर्व काळात पणजीत दोन प्रमुख आस्थापनांद्वारे शिलाई यंत्राची विक्री होत असे. विदेशी बनावटीच्या ‘पाफ’ या शिलाईयंत्राचे पणजीतील विक्रेते होते म्हापशातील प्रतिष्ठित महात्मे कुटुंबातील सदस्य. हे आस्थापन आझाद मैदानाच्या विरुद्ध बाजूच्या जुन्या इमारतीत कार्यरत होते. कै. मोहन महात्मे हे आपल्या ज्येष्ठ बंधूसमवेत इथला व्याप सांभाळत. व्याप छोटा, तसा व्यापाराचा आवाका पण मर्यादित. निवडक गिऱ्हाइके. शिलाई यंत्र मजूर डोक्यावरून नेऊन गिऱ्हाइकाच्या घरी पोहोचवत असे. ‘सिंगर’ या दुसऱ्या प्रकारच्या शिलाई यंत्राची विक्री नाईक कुटुंबाकडे होती. हे आस्थापन तिमाप्पाच्या खानावळीच्या विरुद्ध दिशेला ‘कामरा’च्या जुन्या ‘यू’ आकाराच्या इमारतीत कार्यरत होते. नंतरच्या काळात तेथे टेलिफोनचे कार्यालय किंवा खादी उद्योग भवन आले असावे. आता ती ऐतिहासिक इमारत कमकुवत झाल्यामुळे जमीनदोस्तच करण्यात आली आहे.

पणजीत त्याकाळी लतिफ हा नावाजलेला शिंपी, तर म्हापशात शाव्हीयर. दोहोंची गिऱ्हाइके लब्धप्रतिष्ठित लोकांची. लतिफची हक्काची गिऱ्हाइके म्हणजे पोर्तुगीज शासनातील कर्मचारी. त्याकाळी नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांचा पण शुभ्रधवल नाविक दलासारखा पेहराव करावा लागत असे. अन्यथा टाय अन्‌‍ बूटसूट. यांना लतिफ हा आधारस्तंभ वाटे. लतिफकडून आपले कपडे शिवून घेण्याला पण त्या काळात एक सामाजिक प्रतिष्ठा हेती. आपला सूट किंवा अन्य पेहराव लतिफकडून शिवून घेतला हे अभिमानाने ऐकविले जात असे. लतिफचे हे आस्थापन बाबा ट्रॅव्हलच्या आस्थापनाच्या जागी किंवा शेजारी असावे, नक्की आठवत नाही. लिननचे सूट शिवण्यात लतिफचा हातखंडा. तसेच त्याकाळी ‘शास्कीन’ या झुळझुळीत कापडाचे सूट शिवावे तर लतिफनेच. शास्कीनचे सूट विशेष प्रसंगी वापरत. या शास्कीनच्या सुटावर एकवेळ इस्त्री केली की बस्स; कापडाच्या घडीची छाप कधी बोथट होणार नाही! या झुळझुळीत कापडावर गिऱ्हाइकाला हवे तसे शिवणकाम करणे म्हणजे महाकठीण काम. लतिफ अन्‌‍ त्याच्या मदतनीसाची यावर स्पर्धामुक्त मक्तेदारी. गोवा मुक्तीनंतर पण ललिफकडे गिऱ्हाइके आकर्षित होत असत. लतिफ कपड्यांच्या गर्दीत निष्काम कर्मयोग्यासारखा आपला दर्जीचा व्यवसाय नेकीने करताना दिसत असे. त्यांचे हे आस्थापन केव्हा, कसे अन्‌‍ का बंद झाले याची माहिती देणारे आता कोणी हयात असेल असे वाटत नाही. विठ्ठल शंकरदास आणि वासुदेव शंकरदास या बंधुद्वयींनी पण नेकीने शिंपी व्यवसाय करून गिऱ्हाइकांचा विश्वास संपादल्याचे स्मरते.

अल्फान्सो हा आणखीन एक मुक्तीपूर्व काळातला दर्जेदार शिंपी. याच्या काटेकोर दृष्टिकोनामुळे मापे दिल्यावर वरचेवर ट्रायलसाठी जावे लागे. पोर्तुगीज कर्मचाऱ्यांत पण याला मानाचे स्थान होते. ‘काझारा’साठी कपडे शिवावे ते अल्फान्सोनेच. ट्रायलसाठी अर्धवट शिवलेल्या कोटाला वेगवेगळ्या ठिकाणी एका विशिष्ट मेणकट खडूने खुणा करायचा. शिवाय अघळपघळ भागाला पीना पण लावत असे. मुक्तीनंतर याने ‘सफारी’ हा पेहराव शिवण्यात प्रावीण्य मिळवले. यामुळे गिऱ्हाइकांची येथे वर्दळ कायमच दिसून येत असे. याचे आस्थापन प्रोग्रेस हायस्कूलजवळच्या चिंचोळ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला होते. याचा मुलगा नंतर वाहतूक खात्यात उच्च अधिकारीपदी पोचला. वार्धक्यामुळे अल्फान्सोने आपला व्यवसाय बंद केला आणि त्याच्याबरोबर याचे कसब पण इतिहासजमा झाले. उग्र वृत्तीच्या या शिंप्याला त्यांचे मदतनीसच का, गिऱ्हाईक पण वचकत असे. कुणाची अरेरावी त्याने ना कधी सहन केली, ना आपण कधी अरेरावीची भाषा केली. दिरंगाई हे या शिंप्याचे खास वैशिष्ट्य. कारण, याच्या दर्जेदार कामगिरीचे आकर्षण. परंतु दिरंगाईमुळे कोणाची अडचण होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेतली जात असे. यास्तव गिऱ्हाइकाला त्याच्या नियोजित कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पण रात्रभर जागून केलेला पेहराव तयार असे.

गोवा मुक्तीनंतर ‘आबेल टेलर्स’ प्रकाशझोतात आला. कुठलाही शिंप्याचा व्यवसाय तेजीत दहा ते पंधरा वर्षे चालतो. पणजीत तरी हेच चित्र आम्ही तरुणपणापासून पाहत आलो आहोत. ‘आबेल टेलर्स’ हा आझाद मैदानाजवळ ‘काझ माधव’चा शेजारी. या आस्थापनाचा मालक मिस्कील टकल्या. याचा मापे घेणारा मदतनीस मुस्लीम असावा. मापे हा घेणार अन्‌‍ मालक कपडा कापून देणार, यातच सारे कसब दडलेले असे. कापलेल्या कपड्याची गुंडाळी दर पंधरा मिनिटांनी तो अन्य मदतनीसाकडे फेकायचा. शिवण करण्याचे त्यांचे काम, याची फक्त देखरेख. या आस्थापनाच्या दर्शनी भागाला एक जाड काचेचा अर्धा दरवाजा होता. तुलनेने तलिफ व अल्फान्सोच्या दुकानापेक्षा हे आस्थापन दिमाखदार वाटायचे. परंतु व्यावसायिकतेचा शिरकाव झाला नव्हता. अद्ययावत ‘क्रेसंट टेलर’ वीज खात्याच्या इमारतीजवळ आल्यावर ‘आबेल टेलर्स’च्या धंद्याला ओहोटी लागल्याची चिन्हे दिसू लागली. ‘आबेल टेलर्स’ला ‘क्रेसंट’ याच्या रूपाने आधुनिक प्रतिस्पर्धी उभा राहिला. यामुळे की अन्य कारणामुळे ‘आबेल टेलर्स’ कालांतराने बंद झाले. ‘क्रेसंट’ पण अल्पजीवी ठरले. याच दरम्यान ‘रिअल टेलर्स’चा उदय झाला. ‘सम्राट’ हॉटेलच्या इमारतीत असलेल्या या टेलरिंग आस्थापनाने अल्पावधीत अकल्पित लोकप्रियता मिळवली. अबोल असलेल्या या टेलरमध्ये कसब अन्‌‍ नेतृत्वगुण होते.

गिऱ्हाईक येथे आकर्षित होत होते. कारण अद्ययावत कपडे शिवून मिळण्याची उपलब्धता. कपडे तिथेच विकण्याचा पायंडा याच टेलरने पहिल्यांदा घातला. या प्रयोगाला पण भरपूर प्रतिसाद मिळाला. तरुण वयातच याने भरपूर मागणी असताना टेलरिंग बंद केले अन्‌‍ फक्त कपड्यांची विक्री चालू ठेवली. टेलरिंग बंद करण्याचे कारण कुणालाच कळले नाही. प्रत्येकाने आपापले अंदाज बांधले. या आस्थापनाच्या जवळच, सांतइनेजचा भाग जेथे सुरू होते तेथे पण ‘के. के. टेलर्स’ हे आस्थापन कार्यरत होते. अधू पायाचा एक भागीदार कपडे शिवण्यात निष्णात. स्वभाव पण मनमिळावू. हे आता हयात नाहीत. त्या बाजूने जाताना या आस्थापनाची आठवण जागी होते. आम्ही पणजीत राहत असताना समोरच्या ‘स्कायलार्क’ या इमारतीत ‘बॉम्बे टेलर्स’ हे आस्थापन कार्यरत होते. हंगल या नटासारखा दिसणारा हा शिंपी गुमास्ता कायद्याच्या साप्ताहिक बंदच्या तरतुदीत अडकायचा. दुकान उघडे ठेवायचे त्याच्याकडील एकमेव सबळ कारण म्हणजे त्याचे वास्तव्य त्याच दुकानात असायचे. कालांतराने याने शिंपीकाम बंद करून भुसारी मालाचे दुकान थाटले. आमच्या घराच्या उजव्या बाजूला चॅपेलच्या जवळ एक काळोखी खोली होती. वाशावर इथेतिथे टांगलेले कपडे. हे ‘सावळो टेलर’चे सुप्रसिद्ध आस्थापन. येथे थोरामोठ्यांच्या गाड्यांची रिघ लागायची. पायाने अधू असलेल्या या अबोल शिंप्याकडे कपडे शिवण्याचे देवदत्त कसब असावे. कालांतराने याने कुंडईकरनगरच्या समोर भुसारी मालाचे दुकान थाटले. ‘आंगले ब्रदर्स’च्या खेळ सामानाच्या आस्थापनापाशी पायऱ्यांच्या डाव्या बाजूला चोडणकर हे वयोवृद्ध शिंपी पायजमे शिवण्यात वाकबगार. लेस नजाकतीने लावलेले याचे पायजमे अजून चाळीस वर्षे झाली तरी सुस्थितीत आहेत. धोतर, शर्ट अन्‌‍ कोट या पेहेरावाताली या टेलरचा पुतण्या चौगुले कंपनीच्या आगबोटीवर कप्तानाच्या पदावर होता. आगबोट पणजीच्या धक्क्याला लागल्यावर हे काका पुतण्याच्या भेटीला जात. आजच्या घडीला ‘ॲरोज टेलर’ हा व्हाडा बिल्डिंगमधला एकमेव गोवेकर टेलर चिकाटीने धंदा करताना दिसतो… रेडिमेड कपडे अन्‌‍ बाबू मुस्तफाना शह देत.