पठाणकोट हल्ल्यामागे मसूद अजहर आणि जैश ए महंमद संघटना

0
75

>> तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल

 

पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील जैश ए महंमदचा प्रमुख मसूद अजहर आणि त्याच्या तीन साथीदारांचा हात असल्याचे आरोपपत्र काल मोहाली येथील न्यायालयात सादर करण्यात आले. मसूद हा या हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार असून त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर, शाहीद लतीफ आणि कशीफ जान या त्याच्या तिघा साथीदारांनी दहशतवाद्यांशी हल्ल्यावेळी संपर्क ठेवण्याचे काम केले असेही आरोपपत्रात म्हटले आहे. मसूद अजहरची वाजपेयी सरकारने कंदाहार विमान अपहरणावेळी सुटका केली
होती.
गेल्या वर्षाच्या प्रारंभी पठाणकोट हवाई तळावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते. जवळजवळ तीन दिवस चाललेल्या कारवाईअंती चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. मारले गेलेले चौघेही दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. आरोपपत्रात नावे नमूद करण्यात आलेला शाहीद लतीफ हा पाकिस्तानातील गुजरॉंवालामधील अमिनाबादचा रहिवाशी असून कशीफ जान हा छर्दासा येथील आहे. दहशतवाद्यांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी जान याच्यावर होती असेही आरोपपत्रात म्हटले आहे. पठाणकोट हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी असगर याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा व्हिडिओ जारी केला होता. मसुद अजहरला दहशतवादी घोषित करण्यात यावे या भारताच्या मागणीच्या पुष्ट्यर्थ पठाणकोट हल्ल्याच्या या आरोपपत्राची मदत होणार आहे. यापूर्वी संयुक्त राष्ट्रांद्वारे मसुद अजहर आणि त्याच्या संघटनेवर बंदी आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांत चीनने खो घातला होता. पठाणकोट हवाई तळावर हल्ला चढवणारे चौघे गुरदासपूर जिल्ह्यातील बामियालमधून भारतात घुसले होते. नासीर हुसेन, हाफीज अबु बकर, उमर फारूक व अब्दुल कयुम अशी त्यांची नावे होती. ते सर्व पाकिस्तानमधील वेहारी (पंजाब), गुजरॉंवाला (पंजाब), संघर व सुकूर (सिंध) चे रहिवाशी होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी पथक भारतात तपासासाठी आले होते, परंतु परत गेल्यानंतर भारताने पुरेसे पुरावे दिले नसल्याचा दावा त्यांनी केला होता.