पंतप्रधानांच्या संबोधनानंतर राज्याची पुढील वाटचाल ठरवणार ः मुख्यमंत्री

0
117

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज देशाला संबोधित होणार्‍या भाषणानंतर केंद्राकडून जाहीर होणार्‍या मार्गदर्शक सूचनानंतर राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा निश्‍चित केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आलेले भाग गोव्याच्या नकाशावर सूचित केले जाणार आहे. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या भागाची नागरिकांना जाणीव व्हावी म्हणून नकाशावर सूचित केले जाणार आहे. राज्यातील आठ तपासणी नाक्यावर परराज्यातून येणार्‍या वाहन चालक व इतरांची तपासणी करण्यासाठी रॅपिड टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यावर विचार केला जात आहे. कोरोना रोगमुक्त झालेल्या पाच जणांशी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांच्या आरोग्याबाबत चौकशी केली आहे. त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सरकारी कार्यालये

१५ पासून सुरू

राज्यातील सर्व सरकारी कार्यालये १५ एप्रिलपासून सुरू केली जाणार आहेत. काही खासगी कंपन्यांना कारभार सुरू करण्यासाठी मान्यता दिली जाऊ शकते. सरकारी कर्मचार्‍यांची वाहतूक करण्यासाठी २०६ कदंब बसगाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. सरकारी कार्यालयात पहिल्या टप्प्यात आवश्यक कामकाज हाती घेतले जाणार आहे. नागरिकांनी सध्या आपल्या कामांसाठी सरकारी कार्यालयात येऊ नये, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील खासगी क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करण्यासाठी पर्यटन सचिव राज्यातील खासगी हॉटेल व्यवस्थापनाशी चर्चा करीत आहेत. परदेशात असलेल्या खलाशांना गोव्यात परत आणण्यास मान्यता दिल्यास मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करावी लागणार आहे. त्यामुळे क्वारंटाईन सुविधा वाढविण्यावर चर्चा केली जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील सरकारी इस्पितळांमधील ओपीडी सुरू करण्यात आल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याशी याविषयावर चर्चा करून लोकांची ओपीडीमध्ये गर्दी होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

मजूर, कामगारांना आर्थिक मदत

राज्यात औद्योगिक वसाहतीमध्ये राहणार्‍या नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे. बांधकाम मजूर म्हणून नोंदणी केलेल्या ८६४१ जणांच्या बँक ़खात्यात प्रत्येक ६ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेल्यांना ४ हजार रुपये दिले जात आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आणखी एक आयझोलेशन

वॉर्ड सुरू करण्याची सूचना

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळामध्ये आणखी एक आयझोलेशन वॉर्ड सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. श्‍वसनाच्या तक्रारी असलेल्या नागरिकांवर  या खास वॉर्डात उपचार केले जाणार आहेत. कोरोना विषाणू संशयास्पद असलेल्यांना कोरोना वॉर्डात उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

कोविड इस्पितळामध्ये उपचार सुरू असलेल्या दोन रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. कोविड मार्गदर्शक सूचनेनुसार दोन कोरोना रुग्णांच्या नमुन्यांची परत तपासणी केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गोमेकॉत आणखी

एक रुग्ण दाखल

बांबोळी येथील गोमेकॉच्या कोरोना खास वॉर्डात  कोरोना संशयित एका रुग्णाला काल दाखल करण्यात आला असून कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत प्रलंबित ४२ नमुन्यांपैकी ३० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ३० नमुने नकारात्मक आहेत. १२ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने होम क्वारंटाईनखाली १७१४ लोकांना आणले आहेत. सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये ९ जणांना ठेवण्यात आले आहेत.