पंजशीरमधील धुमश्‍चक्रीत ३५० तालिबान्यांना कंठस्नान

0
41

अफगाणिस्तानमधील पंजशीर भागात सोमवारपासून तालिबान आणि नॉर्दन अलायन्स व माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांत तुंबळ युद्ध सुरू आहे. मंगळवारी रात्री तालिबानींनी पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत सुमारे ३५० तालिबानी ठार झाले असून ४० जणांना ताब्यात घेतल्याचे नॉर्दन अलायन्सने म्हटले आहे. दरम्यान, तालिबानने स्फोटाद्वारे एक पूल उडवल्याचे सांगितले.

अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर पंजशीरचा प्रांत वगळता संपूर्ण अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवला आहे. आता पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबान झटत असून तिथे त्यांना जोरदार विरोध होत आहे.

मंगळवारी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तालिबानच्या ३५० जणांना नॉर्दन अलायन्सने कंठस्नान घातले आहे. तसेच ४० तालिबान्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नॉर्दन अलायन्सने ट्विटरवरुन दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तालिबान्यांना कुठे ठेवण्यात आले आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. तर तालिबान्यांनी पंजशीर खोर्‍यातील एक पूल उडवला आहे. नॉर्दन अलायन्सला या संघर्षादरम्यान शत्रूला ठार करण्याबरोबर शस्त्रांचाही मोठा फायदा झाला असून अमेरिकन बनावटीची अनेक शस्त्रे त्यांच्या हाती लागली आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य माघारी फिरल्यानंतर तालिबान्यांनी सोमवारपासून पंजशीर परिसरात हल्ले सुरू केले आहेत.

अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांतामध्ये प्रवेश केला जातो त्या ठिकाणी तालिबान आणि नॉर्दन अलायन्समध्ये संघर्ष झाला आहे. पंजशीरचे खोरे हा प्रदेश वर्षभऱ बर्फाच्छादित असतो. तालिबानला पंजशीरच्या प्रांतावर ताबा मिळवण्यासाठी नॉर्दन अलायन्ससोबतच येथील भौगोलिक परिस्थितीचाही सामना करावा लागणार आहे.