पंचायतींतील कर्मचाऱ्यांवर ‘एआय’द्वारे देखरेख ठेवणार

0
7

>> पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून स्पष्ट

कामावर उशिरा येणाऱ्या अथवा सुट्टी न घेताच घरी राहणाऱ्या ग्रामपंचायतींतील कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आता एआय (आर्टिफिशल इंटेलिजन्स) यंत्रणेचा आधार घेण्यात येणार आहे, अशी माहिती काल पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी गोवा विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार प्रेमेंद्र शेट यांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

एआय ही यंत्रणा व्यक्तीचा चेहरा ओळखत असते व त्याद्वारे ती व्यक्ती कार्यालयात आहे की नाही हे कळू शकणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले. पंचायत सचिवांविषयी खूप तक्रारी असून, ते कधी कार्यालयात येतात आणि कधी जातात याकडे एआय यंत्रणेद्वारे बारीक लक्ष ठेवणे शक्य होणार असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

पंचायत कार्यालयात बायोमेट्रिक मशीन्स बसवण्यात आली होती; पण तो प्रयोग फसला. काही पंचायतींतील बायोमेट्रिक मशीन्स चालत होती, तर काही पंचायतींतील बंद पडली होती. ती मुद्दाम बंद पाडण्याचे प्रकारही चालू होते. त्यामुळे आता एआय आधारित यंत्रणा बसवण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी गुदिन्हो यांनी दिली.