न्यूझीलंडचा बांगलादेशला व्हाईटवॉश

0
146

>> पावसाने बाधित तिसरा टी-ट्वेंटी सामना ६५ धावांनी जिंकला

पावसाने बाधित तिसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा ६५ धावांनी दारुण पराभव करत मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. प्रत्येकी १० षटकांच्या झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या १४२ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव ९.३ षटकांत अवघ्या ७६ धावांत संपला.

२१ वर्षीय फिन ऍलन व अनुभवी मार्टिन गप्टिल यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी बांगलादेशला झोडपून काढताना ५.४ षटकांत ८५ धावांची सलामी दिली. न्यूझीलंडच्या डावातील पहिली दोन्ही षटके गप्टिलने खेळली. या दोन षटकांत त्याने २३ धावा चोपल्या. ऍलनला या कालावधीत केवळ १ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. यानंतर डावखुरा फिरकीपटू नासुमला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळत ऍलनने आपले खाते उघडले. ऍलनने यानंतर मागे वळून न पाहता सुरेख मैदानी फटके खेळले. बांगलादेशी क्षेत्ररक्षकांनी त्याला तब्बल चार जीवदाने देत गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम केले. गप्टिलने ‘हवाई’ खेळ दाखवण्यात धन्यता मानली तर ऍलनने खेळाडूंमधून चेंडू तटवताना क्वचितच षटकाराचा प्रयत्न केला. महमुदुल्ला जायबंदी झाल्याने या सामन्यात लिटन दासने बांगलादेश संघाचे नेतृत्व केले. परंतु, तो प्रभाव पाडू शकला नाही.

विजयासाठी १४२ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ कधीच विजयी होणार असे वाटले नाही. ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत राहिला. त्यांच्या एकाही फलंदाजाला न्यूझीलंडच्या वेगवान तसेच फिरकी आक्रमणाचा नेटाने सामना करता आला नाही. ईश सोधीच्या जागी खेळणार्‍या टॉड ऍस्टल याने यशस्वी पुनरागमन करताना केवळ १३ धावांत ४ गडी बाद करत बांगलादेशचे कंबरडे मोडले.

धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. अफिफ गो. मेहदी ४४, फिन ऍलन झे. मिराझ गो. तस्किन ७१ (२९ चेंडू, १० चौकार, ३ षटकार), ग्लेन फिलिप्स झे. सरकार गो. शोरिफूल १४, डॅरेल मिचेल धावबाद ११, मार्क चॅपमन नाबाद ०, अवांतर १, एकूण १० षटकांत ४ बाद १४१
गोलंदाजी ः नासुम अहमद २-०-२९-०, तस्किन अहमद २-०-२४-१, शोरिफूल इस्लाम २-०-२१-१, रुबेल हुसेन २-०-३३-०, मेहदी हसन २-०-३४-१
बांगलादेश (लक्ष्य १० षटकांत १४२) ः मोहम्मद नईम झे. चॅपमन गो. ऍस्टल १९, सौम्य सरकार झे. व गो. साऊथी १०, लिटन दास झे. व गो. साऊथी ०, नझमुल हुसेन शांतो त्रि. गो. ऍस्टल ८, अफिफ हुसेन यष्टिचीत कॉनवे गो. ऍस्टल ८, मोसद्देक हुसेन झे. यंग गो. साऊथी १३, मेहदी हसन झे. फिलिप्स गो. ऍस्टल ०, शोरिफूल इस्लाम त्रि. गो. मिल्ने ६, तस्किन अहमद त्रि. गो. फर्ग्युसन ५, रुबेल हुसेन नाबाद ३, नासुम अहमद झे. साऊथी गो. फिलिप्स ३, अवांतर १, एकूण ९.३ षटकांत सर्वबाद ७६
गोलंदाजी ः टिम साऊथी २-०-१५-३, ऍडम मिल्ने २-०-२४-१, लॉकी फर्ग्युसन २-०-१३-१, टॉड ऍस्टल २-०-१३-४, ग्लेन फिलिप्स १.३-०-११-१