नोटांचा भलता वाद

0
23

भारतीय राजकारणामध्ये जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी भलतेसलते भावनिक विषय उकरून काढून त्यावर वादंग निर्माण करण्याची खोड नेत्यांना सर्रास दिसते. चलनातील नोटांवर कोणाचे छायाचित्र असावे ह्या विषयावरून सध्या माजलेले रणकंदन हे अशाच प्रकारचे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्या दिवाळीत एकाएकी हिंदुत्वाचा झटका आला आणि चलनातील नोटांवर लक्ष्मी आणि गणेश या हिंदू देवतांची चित्रे छापावीत म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला समृद्धी येईल व देशाची भरभराट होईल असे विधान करून ते मोकळे झाले. त्यातून उठलेले वादाचे वादळ आता नोटांवरील गांधीजींचे छायाचित्र हटवण्याच्या मागणीपर्यंत येऊन ठेपलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून सावरकर, आंबेडकर, अगदी नरेंद्र मोदींपर्यंतची छायाचित्रे चलनी नोटांवर छापण्याच्या मागण्या करीत लोक हिरीरीने पुढे सरसावले आहेत. अशावेळी एकमेकांना कोंडीत पकडण्याची संधी साधणार नसतील तर ते राजकीय पक्ष आणि नेते कसले?
मुळात केजरीवाल यांना एकाएकी हिंदू देवतांचे स्मरण का झाले? कारण उघड आहे. हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि गुजरात विधानसभेची निवडणूक लवकरच घोषित होणार आहे. या दोन्ही राज्यांतील मतदार बहुतांशी धार्मिक वृत्तीचे असल्याने केजरीवालांना आपल्या ‘आप’च्या आजवरच्या निधर्मी सपक पांढर्‍या चेहर्‍याला हिंदुत्वाचा थोडा रंग फासावासा वाटू लागला असावा. परंतु त्यांच्या ह्या वक्तव्याने भलत्या वादाचे मोहोळ मात्र उठवून दिले आहे.
वास्तविक, चलनी नोटांवर कोणते चित्र छापायचे, त्यांची रचना कशी करायची हा अधिकार रिझर्व्ह बँकेचा व पर्यायाने केंद्र सरकारचा असतो. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाकडून तशी शिफारस केंद्र सरकारपुढे ठेवली जाते व त्यावर केंद्र सरकार सकारात्मक वा नकारात्मक निर्णय घेते. त्यानंतरच सरकारी छापखान्यांतून नोटा आणि टाकसाळींतून नाणी छापली जातात. मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोयडा येथे चार सरकारी टाकसाळी आहेत, तर नाशिक आणि देवास येथे नोटा छापणारे छापखाने आहेत. शिवाय रिझर्व्ह बँकेच्या मालकीचे दोन छापखाने म्हैसूर आणि सालबोनी येथे आहेत. पण नोटांचा आकार, त्यासाठीचे डिझाईन, कागद, सुरक्षात्मक उपाययोजना आदी सर्व गोष्टी फार काळजीपूर्वक कराव्या लागतात, कारण अन्यथा त्यांची नक्कल होण्याची व बनावट नोटा चलनात आणल्या जाण्याची शक्यता असते. मोदी सरकारने नोटबंदीनंतर वेगवेगळ्या रंगांच्या नोटा चलनात आणल्या. दोन हजार रुपयाच्या नोटेसाठी तर मंगलयानाचे प्रतीक वापरले गेले. परंतु त्या नोटेचीही नक्कल अल्पावधीत चलनात आलेली दिसली.
स्वातंत्र्यपूर्व काळात येथील राजवटींच्या राजा वा राणीचे चित्र नोटा वा नाण्यांवर असे. स्वातंत्र्यानंतर संविधानाचे प्रतीक म्हणून अशोकस्तंभाचे चित्र भारतीय नोटांवर आले. मात्र, नव्वदच्या दशकामध्ये महात्मा गांधींचे छायाचित्र नोटांवर आणण्यात आले व कायम राहिले. भारताची आंतरराष्ट्रीय छबी उजळवणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणून महात्मा गांधींकडे पाहिले जात असल्याने आजवर कोणालाही ते खटकले नाही. पण आता क्षुद्र राजकीय स्वार्थाखातर गांधींनाच निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याने चलनी नोटांवरचे गांधीही काहींना खपेनासे झालेले दिसतात. परंतु तेथे अन्य महान व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रे छापायची झाली, तर अशा महापुरुषांची फार मोठी मांदियाळीच आपल्याकडे आहे. मग त्यात प्रदेश, जातपात असे विषयही घुसतील. त्यामुळे मुळात हा वाद ओढवून घेण्याची आज आवश्यकता आहे का, हा खरा प्रश्न आहे.
देवदेवतांच्या प्रतिमा नोटा किंवा नाण्यांवर नसाव्यात असा निवाडा दिल्ली उच्चन्यायालयाने २०१४ साली दिलेला आहे. भारतीय संविधान निधर्मी असल्याने ते विशिष्ट धर्माच्या देवदेवतांच्या प्रतिमा छापण्याचा अधिकार देत नाही असे न्यायालयाने त्या निवाड्यात म्हटले होते. आज देवदेवतांच्या प्रतिमा चलनी नोटांवर छापा असे म्हणणारेच उद्या नोटा फाटतात, चुरगळतात, त्याने देवदेवतांचा अनादर होऊन आपल्या भावना दुखावतात अशी आरडाओरड करीत पुढे सरसावतील. त्यामुळे चलनी नोटांवर छायाचित्र कोणाचे असावे ह्यापेक्षा त्या चलनाचे मूल्य कसे टिकून राहील ह्यावर सरकारने भर दिला तर ते भल्याचे राहील. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सातत्याने भारतीय रुपयाची घसरण चालली आहे. परिणामी व्यापारउदिमापासून पर्यटनापर्यंत प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. नोटांच्या बाह्य रूपापेक्षा त्याचे मूल्य टिकवून धरण्यासाठी व्यापक प्रयत्न झाले तर ते अर्थव्यवस्थेसाठी अधिक उपकारक ठरेल व समृद्धी आणि भरभराटही त्यातूनच होईल.