विभक्त कुटुंब पद्धतीत हरवतेय सण-भक्ती!

0
30
  • रमेश सावईकर

कालानुरूप कितीही बदल झाले तरी माणसाची मानसिकता बदलता कामा नये. माणसा-माणसानं एकत्र येणं, प्रेमानं-मायेनं वागणं, नात्याचे अनुबंध वर्धित करणं हे प्रत्येक कुटुंबातील सदस्यानं लक्षात ठेवून कुटुंबव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्नरत असायला हवं.

आपला हिंदू धर्म हा वैदिक व सनातनी शास्त्राच्या आधारावर चालणारा आहे. ऋषिमुनींच्या काळापासून पुराणकाळानंतर आजच्या काळातही हजारो वर्षांच्या परंपरा, रूढी या धर्माने जतन करून ठेवल्या आहेत. ऐतिहासिक घटनांची स्मृती म्हणून देवदेवतांची पूजा, देवांचा दैत्यांवरील विजय साजरा करण्याच्या निमित्ताने होणारे विजयोत्सव, विविध सण-उत्सव, देवांची आराधना, व्रत-वैकल्यांचे आचरण आदी धार्मिक विधिकर्मे हिंदू लोक भक्तिभावाने करीत आले आहेत.

चैत्र महिन्यात चैत्री उत्सव, गुढी पाडवा, बालचंद्रमाव्रत, दोलोत्सव; वैशाखात अक्षय तृतीया, भावुका अमावास्या; ज्येष्ठ महिन्यात दशहरा, निर्जला एकादशी, वटपौर्णिमा; आषाढात एकादशी, चातुर्मास व्रते, गुरुपौर्णिमा; श्रावण महिन्यात आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रविवारनिमित्त विशेष पूजाअर्चा, नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, पिठोरी अमावास्या; भाद्रपदात धनत्रयोदशी, दीपावली; कार्तिक महिन्यात बलिप्रतिपदा, भाऊबीज, त्रिपुरारी पौर्णिमा; मार्गशीर्ष महिन्यात दत्तजयंती; पौषात मकरसंक्रांती; माघ महिन्यात गणेश जयंती, रथसप्तमी, महाशिवरात्री; फाल्गुन महिन्यात होळी पौर्णिमा, शिगमोत्सव, वसंतोत्सव आदी विविध व्रतोत्सव, लोकोत्सव कौटुंबिक व सामाजिक-सार्वजनिक स्तरावर साजरे होतात.
प्रमुख अशा गुढीपाडवा, आषाढी एकादशी, नागपंचमी, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी, दीपावली, शिगमोत्सव आदी सणांचे महत्त्व जाणून प्रत्येक हिंदू कुटुंब एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने, उमेदीने हे सण साजरे करतात.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. सणवार तसेच उत्सवाला घरातील सर्व लहान-थोर मंडळी तनामनाने एकत्र येऊन आपुलकीच्या व परस्परांवरील नात्याच्या ओढीने आनंदात सण साजरे करायचे. देवदेवतांची पूजा मोठ्या थाटात व्हायची. अवांतर नि बाजारी स्वरूपाऐवजी धार्मिक-शास्त्रीय विधींना प्राधान्य दिले जायचे. पूजा-पाठ व्हायचे. त्यावेळी घरातील २५-३० माणसे सहभागी व्हायची. आरत्या व भजने रंगून जायची. तीर्थ-प्रसाद झाल्यावर जेवणाच्या पंक्ती वाढल्या जायच्या. केळीच्या पानावर विविध गोड पदार्थ, पक्वान्नांची गर्दी व्हायची. घरातील जाणत्या आजी-आया मोठ्या आग्रहाने जेवणाचे पदार्थ वाढायच्या. पोटभर खाऊन ढेकर दिल्याशिवाय पंक्तीतून जेवण संपवून उठणे होत नसे.

उत्सवप्रसंगी लहान मुले दंगा करण्यात, खेळ खेळण्यात, मौजमजा करण्यात वेळेचे भान विसरून रंगून जायची. जाणत्या पुरुषांमध्ये चहाचे घोट घेत गप्पाष्टके रंगायची ती तासन्‌तास! घरातील बायकामंडळीही विविध पदार्थ बनविण्याच्या गप्पागोष्टीत गुंग होऊन जायची. आजी-आजोबांंना सणा-उत्सवाप्रसंगी अपेक्षित असलेल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सार्‍या गोष्टी हव्याच असायच्या. कुठेही तडजोड नसायची. त्यामुळे सणा-उत्सवांना एक आगळे-वेगळे स्वरूप जपले जायचे. देवाची आराधना, भक्तीत दिखाऊपणापेक्षा खरेपणा, आंतरिक ओढ अधिक असायची. त्यामुळे देवदेवतांचा कृपाशीर्वादही तितकाच मोठा लाभायचा. प्रत्येक सणाचे महत्त्व वेगळे. कुटुंबातील सर्वांचा सक्रिय सहभाग, शास्त्र पाळण्यावर कटाक्ष, खेळीमेळीचे वातावरण यामुळे ‘सण असे मोठा, आनंदा नाही तोटा’ अशी स्थिती असायची. पुराणवाचन, कथा-कीर्तने, आरत्या-भजने या गोष्टींना प्राधान्य दिले जायचे.
आता कालमानातील बदलानुसार एकत्र कुटुंबपद्धती जाऊन विभक्त कुटुंबपद्धतीचे प्रमाण अधिक झाले आहे. एकत्र कुटुंबपद्धतीत जीवन जगण्याची जी एक व्यवस्था होती ती आता कोलमडून पडली आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत कुटुंबप्रमुखाचा निर्णय अंतिम असायचा. प्रमुखाला कुटुंबातील सर्व सदस्यांची मते विचारात घेऊन, त्यांच्या भावना जाणून, त्या दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेऊन विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागत असे. बायकामंडळीत स्वयंपाकघरात भांड्याला भांडे आपटते त्याप्रमाणे कधी मतभेद-वादही व्हायचे; पण ते तेवढ्यापुरते, प्रसंगानुरूप असायचे. तो प्रसंग, घटना संपली की पुनश्‍च घरातील वातावरण पूर्ववत नि सुसंगत व्हायचे!
कुटुंबव्यवस्थेचे धागे एवढे घट्ट असायचे की ते सहज तुटत नव्हते. माणसामाणसांत आपुलकीचा ओलावा होता. नात्याचे अनुबंध मजबूत होते. मिळून-मिसळून वागण्याची प्रवृत्ती होती. घरातील कोणाही एका माणसाला नुसतं खरचटलं तरी सर्वांना ‘हाय’ व्हायचं. लागलीच सर्वजणं एकत्र यायची. कोणी चिंता करीत जरा बाजूला जाऊन बसला तर त्याची काय चिंता आहे, ती दूर कशी करायची याचा विचार व्हायचा. मनावर येणारे तणाव विभागले जायचे, त्यामुळे ताण-तणावमुक्त जीवन जगण्याची संधी लाभायची. उत्सव व सणासुदीला अख्खे कुटुंब मनोभावे एकत्र आल्याने आनंद द्विगुणित होऊन उत्साहाला उधाण यायचे. आज जीवनाच्या उत्तरार्धात असलेल्या पिढीतील लोकांना याची अधिक तीव्रतेने जाणीव होत असते. कारण गतपिढीतल्या जाणत्यांची धार्मिक शास्त्रानुरूप सण-उत्सव साजरे करण्याची पद्धत, रूढी, परंपरा यांचा अनुभव घेतलेली ही माणसे आहेत.

विभक्त कुटुंबपद्धतीने मूळ धरून ती दिवसेंदिवस अधिक रूढ होत असताना माणसांच्या जीवनातील एकूणच बदल, स्थित्यंतराचा परिणाम (मारक म्हणा किंवा तारक), वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अतिरेकी हव्यासापोटी निर्माण झालेला कौटुंबिक दुरावा, नात्यांमधला विस्कळीतपणा, तकलादूपणा आणि आधुनिकतेच्या आहारी जाऊन बाजारूपणाच्या मोहात गुरफटत चाललेल्या कुटुंबातील सदस्यांची जीवनशैली, यांचे वर्चस्व वाढल्याने सामाजिक जीवनाची संकल्पनाच नष्ट होत आहे. हा अनुभव आता साठी-सत्तरी गाठलेल्या माणसांना अधिक तीव्रतेने येत आहे.
पूर्वी मातीच्या भिंतीची, कौलारू छप्परांची घरे होती. मातीच्या भिंतीना आपुलकीचा, मायेचा ओलावा होता. कौलारू छप्परांना पागोळ्या अंगणात पाडण्याचे औदार्य होते. घराच्या शेजारी सारवलेल्या जमिनींना पावित्र्य होते. गोमातेचे वात्सल्य होते. त्यामुळे त्या जमिनीवर स्थिरावलेला तिचा पुत्रही तिच्याएवढाच वात्सल्यरूपी, सर्वाधारक होता. तेच घराचे, मातीचे, जमिनीचे गुण घरात राहणार्‍या माणसांच्या रक्तात भिनले जायचे.

कालानुरूप माणसानं बदलावं, जीवनशैली- पद्धती बदलावी, रीती-परंपरा यांना केवळ सोयीस्कर प्रमाणात फाटा द्यावा. पण त्यामागील मूळ धार्मिक-शास्त्रीय विधी-संकल्पनांना स्वतःच्या मनोलहरीनुसार अव्हेरू नये. कुटुंब विभक्त होतात, पण त्याचबरोबर विभक्त कुटुंबातील सदस्यही एवढे स्वतंत्र होऊ पाहतात की ते एकमेकांपासून अलिप्त राहून आंतरिक ओढीअभावी विभक्त असल्यासारखेच वागतात.

आज घरांची जागा बंदिस्त फ्लॅटने घेतली. त्याचबरोबर फ्लॅटमध्ये वास्तव्य करणारे लोक समाजजीवनापासून अधिक दूर राहून स्वतःपुरतेच बंदिस्त होऊ पाहताहेत. त्यामुळे शेजारधर्माची घडीही विस्कळीत झाली आहे. कालानुरूप कितीही बदल झाले तरी माणसाची मानसिकता बदलता कामा नये. माणसा-माणसानं एकत्र येणं, प्रेमानं-मायेनं वागणं, नात्याचे अनुबंध वर्धित करणं हे प्रत्येक कुटुंबातील सदस्यानं लक्षात ठेवून कुटुंबव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्नरत असायला हवं.

आपण सण साजरे करतो. त्यामागे देवदेवतांची आराधना, भक्ती, पूजाअर्चा, प्रार्थना आदी सर्व बाबी असल्या तरी, कुटुंबातील एकता, सौख्यभाव, परस्परांमधील नातेसंबंध अधिक दृढ, मजबूत व्हावेत असा उद्देश आहे. तोही तेवढाच महत्त्वाचा! पण दुर्दैवानं तसं घडत नाही. कुटुंबातील विभक्तपणा, माणसांतील दुरावा, वैयक्तिक स्वातंत्र्याचे अवडंबर, वृथा स्वाभिमान, गर्व, श्रीमंतीचा आव-बडेजावकीपणा याच (अव)गुण-प्रवृत्ती फोफावत आहेत.

चतुर्थी-दिवाळीसारख्या प्रमुख सणांना तरी ऐसपैस स्थिरस्थावर झालेली मूळ एकाच कुटुंबातील परंतु विभक्त होऊन राहणारी उपकुटुंबे एकत्र यायची. सणावारी येऊन सण-उत्सव संपेपर्यंत एकत्र गुण्यागोविंदाने राहायची. पण हळूहळू तेवढंही आज घडलेलं अनुभवास येत नाही. अर्थात या गोष्टीला आपल्या गोव्यात अजूनही बर्‍याच ठिकाणच्या काही कुटुंबांचे अपवाद आहेत.
मी आणि माझे छोटे कुटुंब, त्याशिवाय अन्य कुटुंबाशी माझा कसलाच संबंध नाही, अशी श्रद्धा-भावना ठेवून फक्त आपल्यापुरतंच सर्वकाही करायचं. मूळ कुटुंबाकडे पाठ फिरवायची ही एक प्रवृत्तीच बनली आहे. याचं कारण असं असू शकतं की एकाच कुटुंबातील माणसं आपणा-आपणामध्येच स्पर्धात्मक जीवन जगणं पसंत करीत असावीत. समाजातील इतर स्पर्धायोग्य माणसांशी स्पर्धा करण्याचं धैर्य अशा माणसांत नसतं. ही प्रवृत्ती आजच्या समाजात एवढी सोकावली आहे की त्यामुळे हिंदुधर्मीय लोकांच्या सणा-उत्सवांच्या ऐक्याला, खर्‍या उत्साह-उमेदीला अन् मौजमजेला गालबोट लागलं आहे. काळ बदलल्यामुळे हे घडणं, तसं वागणं माणसांना क्रमप्राप्त आहे असे विभक्त कुटुंबातील माणसं जी कारणे देतात ती निव्वळ तकलादू व फजूल आहेत. काळ बदलतो, स्थित्यंतरे होतात, त्यातून माणसांनी सुवर्णमध्य काढायला हवा. नुसतं ‘कालाय तस्मै नमः’ म्हणून अंग टाकून भागणार नाही आणि त्यातून खरा धर्मही टिकणार नाही!