नोकरी घोटाळ्यात सत्ताधारी अन्‌‍ विरोधकही सामील : ख्रिस्तोफर फोन्सेका

0
5

राज्यात सरकारी नोकरीचा घोटाळा मोठा असून, त्यात सत्ताधारी पक्षातील मंत्री, नेते आणि विरोधक सुध्दा गुंतलेले आहेत, असा आरोप आयटकचे कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी आयटकच्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल केला.

राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी नोकरभरतीचा घोटाळा सुरू आहे. या नोकरभरतीचा पोलीस यंत्रणेने योग्य तपास करण्याची गरज आहे. तथापि, पोलीस यंत्रणा या घोटाळ्यामध्ये राजकारणी व्यक्तींचा सहभाग नसल्याचे प्रमाणपत्र देतात ही आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासकामाबाबत शंका येत आहे, असेही फोन्सेका म्हणाले. यावेळी कामगार नेते राजू मंगेशकर व इतरांची उपस्थिती होती.

राज्यातील फेरीबोट सेवेच्या खासगीकरणालाही विरोध केला जाणार आहे, असेही फोन्सेका यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्य सरकारने फेरीबोट सेवेचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. राज्यात नागरिक मोठ्या प्रमाणात फेरीबोटसेवेचा वापर करीत आहेत. सध्या फेरीबोटमध्ये प्रवासी व दुचाकी वाहनचालकांना मोफत प्रवेश मिळत आहे; परंतु फेरीबोट सेवेचे खासगीकरण झाल्यास प्रवाशांना फटका बसणार आहे, असे फोन्सेका म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात केंद्रीय कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला राज्यातील आयटक या कामगार संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. राज्यातील कामगार मंगळवारी (दि.26) आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत. पिकांसाठी एमएसपी, कर्जमाफी, तसेच कामगारविरोधी कायदे मागे घेण्याची मागणी आंदोलनात करण्यात येणार आहे, असेही फोन्सेका यांनी सांगितले.