नोकरीच्या पहिल्याच दिवशी पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

0
23

>> केरी – फोंडा येथे दुचाकीची वीजखांबाला धडक बसून अपघात

वीज खांबाला स्कूटरची धडक बसून रचत अशोक सतरकर (21, अडकोण, बाणस्तरी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. केरी-फोंडा येथे शनिवारी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेला रचत सतरकर हा युवक नव्यानेच पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त झाला होता. पोस्टिंग होण्यापूर्वीच कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 26 एप्रिल रोजी वाळपई पीटीएस येथे पार पडलेल्या दीक्षांत सोहळ्यात रचत सतरकर यांना कॉन्स्टेबलपदी नियुक्त करण्यात आले होते. शनिवारी मुख्यालयात जाऊन हजेरी लावून रचत सतरकर हे शनिवारी रात्री मडगांव येथे व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मित्रांसह गेले होते. केरी येथे राहणाऱ्या मावशीच्या घरी रात्री उशिरा जीए 05 एन 9643 या दुचाकीने ते जात होते. सातोडे केरी येथे पोहचल्यावर दुचाकीची धडक रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज खांबाला बसली. यात चालक रचत हे गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळले. मागाहून अन्य वाहनाने येणाऱ्या त्याच्या मित्राने अपघात घडल्याचे पहिल्यानंतर 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यावेळी जखमी रचत यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या अपघाताची माहिती म्हार्दोळ पोलिसांना दिल्यानंतर निरीक्षक योगेश सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगांव येथे पाठवून दिला. रविवारी सकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

रचत सतरकर या तरुणाची प्रशिक्षण घेतल्यानंतर दि. 26 रोजी कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अजून पोस्टिंग मिळाली नसल्याने शनिवारी रचत सतरकर यांनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावली होती. मुलगा पोलीस बनल्याने आई – वडीलसह भाऊ व बहीण आनंदात होचे. पण नोकरीच्या पहिल्याच दिवशी रचत सतरकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीय हादरून गेले आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.