हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमातील अखेरच्या साखळी सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेडने माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला २-२ असे बरोबरीत रोखले. भरपाई वेळेत लालीयनझुला छांगटे याच्या गोलमुळे नॉर्थईस्टला बरोबरी साधता आली. दहा खेळाडूंनिशी खेळावे लागलेल्या चेन्नईयीनला या निकालामुळे तिसरा क्रमांक मिळविता आला नाही, पण बाद फेरीतील त्यांचा प्रवेश यापूर्वीच नक्की झाला होता.
एफसी गोवा (१८ सामन्यांतून ३९), एटीके एफसी (१८ सामन्यांतून ३४) आणि बेंगळुरू एफसी (१८ सामन्यांतून ३) यांच्यासह चेन्नईयीनने बाद फेरीत आगेकूच केली. विजय मिळाला असता तर गतविजेत्या बेंगळुरू एफसीला मागे टाकणे चेन्नईयीनला शक्य झाले असते, पण चेन्नईनचा चौथा क्रमांक कायम राहिला. १८ सामन्यांत आठ विजय, पाच बरोबरी व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २९ गुण झाले.
नॉर्थईस्टचा शेवटून दुसरा म्हणजे नववा क्रमांक कायम राहिला. त्यांनी १८ सामन्यांत दोन विजय, आठ बरोबरी व आठ पराभव अशा कामगिरीसह १४ गुण मिळविले.
खाते उघडण्याची शर्यत चेन्नईनने जिंकली. १७व्या मिनिटाला टोंडोबा सिंगने थ्रो-ईनवर चेंडू गोलक्षेत्रात टाकला. त्यावर सैघानीने प्रयत्न केला, पण नॉर्थईस्टचा बचावपटू वेन वाझ याला चेंडू नीट अडविता आला नाही. त्यामुळे चेंडू पुन्हा सैघानीच्या दिशेने आला. मग सैघानीने डाव्या पायाने अचूक फटका मारत गोल केला. हा चेंडू नॉर्थईस्टचा गोलरक्षक सोराम पोईरेकीच्या हाताला लागून नेटमध्ये गेला.
४१व्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या मध्य फळीतील ज्योस लेयूदोने निंथोईच्या दिशेने चेंडू मारला, पण टोंडोबाने निंथोईला गोलक्षेत्रात पाडले. त्यामुळे टोंडोबाला लाल कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले आणि नॉर्थईस्टला पंच प्रांजल बॅनर्जी यांनी पेनल्टी बहाल केली. त्यावर चॅव्हेजने अचूक लक्ष्य साधले.
मध्यंतरास १-१ अशी बरोबरी कायम होती. त्यानंतर दुसर्या सत्रात चॅव्हेजने चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिली होती, पण छांगटेच्या गोलमुळे त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले.