नमस्ते ट्रम्प!

0
284

जागतिक महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अखेर काल भारतात शानदार आगमन झाले. कालचा दिवस जणू भारत – अमेरिका मैत्रीसंबंध दृढमूल करण्याचा होता. भारतीय सांस्कृतिक विरासतीचे भव्यदिव्य, नेत्रदीपक दर्शन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना घडविण्यात आले. स्वतः पंतप्रधान मोदींनी गांधीजींच्या साबरमती आश्रमाची सफर ट्रम्प दांपत्याला घडविली. जगातील सर्वांत संहारक सत्तेचा राष्ट्राध्यक्ष साबरमतीमध्ये शांती आणि अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्यापुढे नतमस्तक होताना पाहणे हा अनोखा अनुभव होता. गांधीजींच्या चरख्यापाशी जमिनीवर बसून ट्रम्प यांनी सूतकताई कशी करतात हे स्वतः आस्थापूर्वक समजावून घेतले. आश्रमाच्या साध्यासुध्या वास्तूच्या ओसरीवर जागतिक महासत्तेचा हा अध्वर्यू काही क्षण विसावला, वाईट बोलू नका, वाईट बघू नका, वाईट ऐकू नका असे सांगणार्‍या तीन माकडांच्या संगमरवरी प्रतिकृतीचा अन्वयार्थही मोदींनी त्यांना समजावून दिला. हे सगळे क्षण ऐतिहासिक महत्त्वाचे आहेत. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये त्यांचे लक्षावधी नागरिकांच्या उपस्थितीत झालेले भव्यदिव्य स्वागत नेत्रदीपक तर होतेच, त्याच बरोबर भारताच्या विराट मानवसंसाधनाचे ते एक प्रातिनिधिक रूपही होते. ट्रम्प यांची ही भारत भेट या देशाला त्यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून दिलेली पहिलीवहिली भेट तर आहेच, परंतु त्याच बरोबर जिला राजनैतिक भाषेत ‘स्टँड अलोन व्हिजिट’ म्हणतात तशी केवळ एकाच देशापुरती भेट आहे हा तिचा एक महत्त्वाचा विशेष आहे. या भेटीतून फार मोठ्या व्यापारी कराराची अपेक्षा करू नका असे सूतोवाच त्यांनी भारतात येण्याआधीच केलेले आहे, त्यामुळे मोठ्या व्यापारी कराराची या भेटीत अपेक्षा नाही, परंतु कालच्या आपल्या भाषणामध्ये ट्रम्प यांनी तीन अब्ज डॉलरच्या बहुचर्चित संरक्षणविषयक कराराची औपचारिक घोषणा केली आहे. कालच्या त्यांच्या भाषणाचा सर्वांत महत्त्वाचा व दखल घेण्याजोगा विशेष म्हणजे ह्यूस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ नंतर पुन्हा एकवार अगदी स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी ‘कडव्या इस्लामी दहशतवादा’चा धिःक्कार केला. पाकिस्तान आपला मित्र देश आहे, परंतु दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यास आपले सरकार त्यांना भाग पाडते आहे असे ट्रम्प यांनी सांगितले आहे हे उल्लेखनीय आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारताचे वैविध्य, लोकशाही मूल्यांची भारताने केलेली जपणूक आणि येथील सहिष्णुता यांचा मुक्तकंठाने गौरव ट्रम्प यांनी केला. काश्मीर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प भारताला खडे बोल सुनावतील असा जो प्रचार चालला होता, त्याबाबत आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी तरी ट्रम्प यांनी मौन बाळगले. भारताने गेल्या सत्तर वर्षांत केलेली आर्थिक प्रगती लोकशाहीच्या मार्गाने केलेली आहे, नागरिकांवरील जोरजबरदस्तीने नव्हे या त्यांच्या विधानाचा रोख थेट चीनकडे होता हे उघड आहे. अमेरिका आणि भारताचे मैत्रीसंबंध हे केवळ उभय देशांमध्ये स्थैर्य निर्माण करण्यापुरतेच नसून जागतिक विवादांच्या सोडवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत असे ट्रम्प म्हणाले आहेत. जागतिक परिस्थितीचा विचार करता आज अमेरिका चीनला काटशह देण्यासाठी भारताशी मैत्रीसंबंध वृद्धिंगत करू पाहात आहे हे उघड आहे. त्यामुळे या परिस्थितीचा धोरणात्मक दृष्टीने लाभ मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये भारत आहे. त्या दृष्टीने ट्रम्प यांची ही भारतभेट ऐतिहासिक महत्त्वाची आहे. कालच्या अग्रलेखामध्ये या भेटीची पार्श्वभूमी आणि त्यातून असलेल्या अपेक्षा यांचा उहापोह आम्ही केलेलाच आहे. ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या पहिला दिवसाचा त्यांचा एकूण रागरंग अवघा मोदीमय झालेला दिसला. मोदींच्या प्रशंसेत त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. अर्थात, व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याची बात करतानाच ते एक ‘खमके वाटाघाटी करणारे’ आहेत असा टोलाही त्यांनी हाणला, जो भारताच्या व्यापारी हिताच्या दृष्टीने एका परीने मोदींसाठी प्रशस्तीची थापच म्हणावा लागेल. अमेरिका भारताचा एक निष्ठावान मित्र आहे असे ट्रम्प यांनी काल ठासून सांगितले आहे. मायदेशी अमेरिकेत चाळीस लाख मूळ भारतीय मतदारांची मदत आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या येत्या फेरनिवडणुकीत आपल्याला गरजेची आहे याचे पूर्ण भान ट्रम्प यांना असल्याचे दिसते आहे. बराक ओबामांच्या पारड्यात दोन्ही वेळा ऐंशी ते नव्वद टक्के मते टाकणार्‍या मूळ भारतीय मतदारांपैकी केवळ १४ टक्के मतदारांनीच त्यांच्यासाठी गेल्या निवडणुकीत मतदान केलेले होते. येत्या फेरनिवडणुकीत ते पारडे आपल्या बाजूने फिरावे यासाठी ट्रम्प यांची धडपड आहे. शिवाय भारतासारख्या उभरत्या आर्थिक महासत्तेला सोबत घेऊन आपला जागतिक प्रभाव दृढमूल करण्याचा आणि चीन – रशियाला शह देण्याचा प्रयासही या भारतप्रेमातून स्पष्ट दिसतो. तिसरी बाब अर्थातच अमेरिका अपेक्षित असलेले स्वतःचे व्यापारी हित हे आहे. येथील प्रचंड मोठी बाजारपेठ त्यांना खुणावते आहे. येणारा काळ भारताचा असणार आहे याची चाहुल अमेरिकेला दिवसेंदिवस भारताच्या अधिकाधिक जवळ आणत चालली आहे त्याचाच प्रत्यय काल आला आहे.