नीरज चोप्राचे सुवर्णयश

0
30

महाकवी कालिदास यांच्या रघुवंशममधील श्लोकातील एका ओळीचा उल्लेख करायचा झाल्यास ‘पदं ही सर्वत्र गुणैर्निधीयते’ अर्थात चांगली कृती सर्वत्र आपली छाप सोडत जाते. याचा प्रत्यय भारताचा नीरज चोप्राच्या बाबतीत वेळोवेळी येत असतो. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरल्यानंतर स्वतःचा मोठेपणा न मिरवता ‘सभी भारतीयोंका धन्यवाद, हम सभींको मिलके देश का नाम उँचा करना है, 90 मीटर सवालका जवाब अभी ढूंढना हे, ही त्याची वाक्ये कानी पडताच सच्च्या भारतीयांच्या डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळणे साहजिकच आहे. स्टार खेळाडूचे वलय असतानादेखील कोणताही डामडौल नीरजच्या कृतीतून कधीही दिसलेला नाही. जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ भारताचाच नव्हे तर पहिला आशियाई खेळाडू ठरला.
खेळाच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमला रौप्य पदक प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मेहनतीची दाद देण्यासाठी नीरजने घेतलेली गळाभेट संस्मरणीय ठरली. नदीमने मागील वर्षी बर्मिंघममधील स्पर्धेत 90.18 मीटर अंतर कापले होते. त्यामुळे त्याच्याकडून सुवर्ण अपेक्षित होते. पण, त्याला या कामगिरीच्या जवळपासही जाता आले नाही खरे, तरीही 88.17 मीटरसह नीरजने सुवर्ण जिंकले. नदीम 87.82 मीटरसह दुसऱ्यास्थानी राहिला. नीरजने सुवर्ण कमाईनंतर आनंदाच्या ओघात विदेशी चाहत्याने स्वाक्षरीसाठी भारताचा राष्ट्रध्वज पुढे केल्यानंतर त्यास नम्रपणे नकार देणाऱ्या नीरज याने आपल्या देशभक्तीचे दर्शन घडवत देशवासीयांच्या मनातील स्थान आपल्या या कृतीने अधिक भक्कम केले.
नीरजने 2016 साली याच स्पर्धेच्या ज्युनियर प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घालत भविष्याचे संकेत दिले होते. प्राथमिक फेरीतील दमदार प्रदर्शनानंतर अंतिम फेरीत नीरजचा पहिला प्रयत्न ‘फाऊल’ठरला. यामुळे 12 खेळाडूंमध्ये तो शेवटच्या स्थानावर फेकला गेला होता. परंतु, याचा काडीमात्र फरक त्याच्या देहबोलीवर जाणवला नाही. नव्या जोमाने त्याने दुसऱ्या प्रयत्नात 88.17 मीटर अंतर कापत आपले सुवर्ण जवळपास निश्चित केले. उर्वरित तीन प्रयत्नात त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. इतर प्रतिस्पर्धी तर त्याच्या जवळपासही फिरकू शकले नाहीत. नीरजचे कौतुक होत असतानाच डीपी मनू व किशोर जेना यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसा अनुभव गाठीशी नसतानादेखील घेतलेल्या भरारीचे कौतुक करावे तेवढे थोडेच..मनूने तिसऱ्या प्रयत्नात 83.72 मीटर अंतर पार केले तर किशोरने दुसऱ्या प्रयत्नामध्ये 82.82 मीटरचा टप्पा गाठला. अशाप्रकारे, दोन्ही भारतीय देखील आघाडीच्या 8 खेळाडूंमध्ये राहिले आणि त्यांना शेवटच्या टप्प्यासाठी अजून तीन फेक करण्याची संधी प्राप्त झाली.
प्रत्येक मोठ्या चॅम्पियनशिप आणि स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची सवय लावलेल्या नीरजने भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात यापूर्वी कधीही न घडलेला पराक्रमही केला. जागतिक अजिंक्यपद स्पध्रेमध्ये 2 पदके जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला. नीरजने गेल्या वर्षी युजिनमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सात ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय भाला दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने घेतला होता. आता जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील नीरजच्या सुवर्णपदकामुळे 27 ऑगस्ट या दिवसाला देखील भारतीय क्रीडा इतिहासात वेगळे स्थान मिळणार हे मात्र निश्चित आहे. किशोर जेना व डीपी मनू यांनी भालाफेकीत अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक मिळवून भारतीयांच्या आनंदात आणखी भर टाकली. ही दोन पदके म्हणजे क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनाची भेट होय.
क्रीडा क्षेत्रात भारताची होत असलेली प्रगती अन्य खेळांतही ठळकपणे दिसते आहे. नीरजने देशाला मिळवून दिलेला मान ज्याप्रमाणे उल्लेखनीय आहे, त्याचप्रमाणे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेला प्रज्ञानंद याची कामगिरीही प्रशंसनीय आहे. भारतीय खेळाडूंची ही विविध खेळातील चमक पाहाता, योग्य सुविधा मिळाल्यास देशातील ग्रामीण भागांतील खेळाडूंही चांगले खेळू शकतात असे दिसते. प्रज्ञानंदाची चिकाटी आणि नीरजचा ध्यास याला सातत्याची साथ मिळाली आहे. आपले ध्येय निश्चित करीत जर खेळाडू खेळले तर आगामी ऑलिंपिकमधील पदकांची संख्या वाढू शकेल, अशी अपेक्षा चुकीची ठरणार नाही.