नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट 2026 परीक्षेच्या पेपरफुटीबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने केलेल्या प्राथमिक तपासात परीक्षेपूर्वी फिरत असलेल्या हस्तलिखित संभाव्य प्रश्नपत्रिकेतील (गेस पेपर) अनेक प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेत आल्याचे समोर आले आहे. देशभरात 3 मे रोजी नीटची परीक्षा झाली होती.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या संभाव्य प्रश्नपत्रिकेत एकूण 281 प्रश्न होते. त्यापैकी तब्बल 135 प्रश्न नीट परीक्षेतील प्रश्नांशी जुळले. विशेष म्हणजे जीवशास्त्रातील सर्व 90 प्रश्न आणि रसायनशास्त्रातील सर्व 45 प्रश्न या संभाव्य प्रश्नपत्रिकेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 600 गुणांचे प्रश्न आधीच उपलब्ध होते, असा संशय व्यक्त होत आहे.
ही संभाव्य प्रश्नपत्रिका 1 मेपासून राजस्थानमधील सीकर भागात फिरू लागल्याचे तपासात आढळले. विद्यार्थ्यांना हा पेपर 20 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत विकला जात होता. परीक्षेच्या आदल्या रात्री काही ठिकाणी तो 30 हजार रुपयांना विकला गेल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी मोबाईल चॅट्स आणि सोशल मीडियावरील संदेशांचीही चौकशी सुरू आहे. काही संदेशांवर ‘फॉरवर्डेड मेनी टाईम्स’ असा उल्लेख आढळल्याने मोठ्या प्रमाणात प्रश्नपत्रिका पसरल्याचा संशय आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राजस्थान पोलिसांच्या अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. सध्या तपास यंत्रणा या प्रकरणामागे संघटित रॅकेट आहे का, याचा शोध घेत आहेत.