निष्पाप

0
38
  • सौ. प्राजक्ता प्र. गावकर,
    नगरगाव-वाळपई

राकेशने तिला फरफटत ओढत आणून अंगणात टाकले व तो घरात निघून गेला. जया अंगणात पडली होती. रात्रीच्या गार वार्‍याने तिला शुद्ध आली तेव्हा तिला अंगावरच्या चटक्यांची जाणीव झाली. वेदनेने कळवळत तिने विहिरीकडे धाव घेतली.

‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते’, असे म्हणतात. पण स्त्रीचा जन्म हा आनंद उपभोगण्यासाठी नसून दुःख भोगण्यासाठीच असतो असेच म्हणावे लागेल.

स्त्रीच स्त्रीची शत्रू असू शकते. जन्मानंतर आई-वडिलांच्या प्रेमळ छायेखाली मोठी होत तारुण्यात पदार्पण करते. समाजाच्या विकृत नजरांपासून स्वतःला वाचवत ती दिलेल्या घरी जाते. पण त्या घरात तिला सुख मिळेलच याची काय शाश्‍वती? सासू, नणंद, जाऊ, तिच्या जिवावर उठलेल्या असतात.

पहाटे झुंजूमुंजूच्याही आधी उठून घरातले काम उरकावे. सर्वजण उठायच्या आत नाश्ता तयार ठेवायचा. जरा कुठे इकडचे तिकडे झाले तर सासूचा मार चुकत नसे. जीवेची कुजकी बोलणी, टोमणे. नणंदेने केलेली कागाळी लावालावी यांनी ती बिचारी गांजून गेलेली असते. सासरी येताना रसरशीत कांती असलेलं तिचं रूप दिवसें दिवस मलूल होत जातं आणि ज्या अभागिनीला हा जाच सहन होत नाही. सोसवत नाही ती अबला, आपला लाखमोलाचा जीवही संपवायला मागे पुढे बघत नाही. अशीच एक अबला… जया.

जया ही सुशिक्षित कुटुंबातली मुलगी. आईवडील भाई बहीण आणि जया असे पंचकोनी कुटुंब. वडील शिक्षक, आई गृहिणी, बहीण आणि भाऊ अनुक्रमे महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी. स्वतः जया बँकेत नोकरी करत असे. सकाळी नऊ वाजता जया कामावर जायची ते सायंकाळी पाच वाजता काम संपवल्यावर सरळ घरी पोचायची. इकडे तिकडे कुठेही जाणे नाही. सायंकाळी सातच्या आत घरी पोचायलाच हवे हा शिरस्ता.

तर… ही जया कामावर जायची यायची त्या वेळेत एक तरुण बस स्टँडवर उभा असे. स्वतःची कार एका बाजूला उभी करून तो बसला उभा असल्यासारखा तिथे उभा राहून जयाला पाहत राही. जया निघून गेली की तो आपल्या घरी जाई. असे फार दिवस चालले.
एका दिवस त्याने जयाचा गुपचूप पाठलाग करून तिचे घर हेरून ठेवले. त्यानंतर थोड्याच दिवसात त्याने जयाला मागणी घातली.
त्याचे नाव राकेश. श्रीमंत घरातला एकुलता एक मुलगा. बहिणीचे लग्न झालेले. घरात आई वडील आणि राकेश. त्यातल्यात्यात राकेशच्या आईने सांगितले, आम्हाला काहीच नको, फक्त नारळ आणि मुलगी द्या.

जयाच्या वडिलांना वाटले हे लोक चांगलेच असणार. त्यांना स्थळ पसंत पडले आणि जयाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. जया सोनेरी स्वप्ने पाहत सासरी आली. नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले. आता रोजचे रुटीन सुरू झाले.

घरा दारात वैभव होते. सासूला काही कामच नव्हते. दिवसभर मैत्रिणी गोळा करून चकाट्या पिटायच्या, जयाला खायचे पदार्थ करून द्यायला सांगायचे. उष्ट्या खरकट्या भांड्यांची रास करून जयाला घासायला लावायचे. जया बिचारी सर्व निमूटपणे सहन करायची. राकेश संध्याकाळी घरी आला की त्याच्या प्रेमात विरघळून जायची. असेच काही दिवस गेले आणि…!..
एक दिवस जयाची नणंद सासरी आपल्याला त्रास होतो म्हणून सांगत कायमचीच माहेरी राहायला आली. आधीच सासू जयाला त्रास देत होती, आता नणंद आल्यावर तिच्या त्रासात आणखीच भर पडली.

सासू आणि नणंद जयाला हवे तसे पिळून काढत. पण जयाने एका शब्दानेसुद्धा राकेशजवळ किंवा माहेरी तक्रार केली नाही. सासू आणि नणंदेचं तिच्या या सोशिकपणाने बरंच फावलं. आता त्यांनी जयाला जरा बाहेर गेली की कुठे गेली होतीस? कुणाबरोबर गेली होतीस? कुणाकडे बोलत होतीस? तो कोण? तुझा आणि त्याचा संबंध काय? अशा प्रश्‍नांचा भडिमार करणे सुरू केले. त्यांच्या या प्रश्‍नांची उत्तरे देताना तिला जमीन दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे होईल असे वाटत होते.
तिला या प्रश्‍नांबरोबरच मार बडवही होत असे. सोबत शिव्याही खाव्या लागत होत्या. तिला भयंकर मनस्ताप होई. याचा परिणाम ती दिवसेंदिवस कृश झाली. तिला अन्नपाणी गोड लागेना. तशातच तिला दिवस गेले. जयाला वाटले आता तरी सासू आणि नणंद आपले वागणे सुधारतील. पण… नियतीच्या मनात काही निराळेच होते.

सासू व नणंदेने आता राकेशचे कान भरायला सुरुवात केली. आज ती समोरच्याच घरात त्यांच्या मुलाबरोबर खूप वेळ गप्पा मारत बसली होती. राकेशने ऐकून घेतले. पण तो काही बोलला नाही. एक दिवस जया सासूला सांगून बाजारात भाजी आणण्यासाठी गेली तेव्हा तिला बाजारात तिचे बाबा भेटले. ‘‘बाबा’’ म्हणत जया वडिलांजवळ गेली.

बाजारातच कुठे बसणार म्हणून तिच्या वडिलांनी तिला हॉटेलमध्ये नेले. जया कुणाबरोबर तरी हॉटेलमध्ये गेलेली तिच्या सासूच्या मैत्रिणीने पाहिले व घरी येऊन तिच्या सासूला सांगितले,‘‘जया कुणाबरोबरतरी हॉटेलमध्ये गेली आणि थोड्या वेळाने बाहेर आली. तिच्याबरोबर असलेल्या माणसाने तिला काही पैसेही दिले, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले.’’ झाले! जयाच्या सासूला आयतेच निमित्त मिळाले.

संध्याकाळी राकेश कामावरून घरी आल्यावर शेजारणीने सांगितलेला सारा प्रकार सासूने राकेशच्या कानावर घातला. वर म्हणाली,‘‘सांभाळ बाबा, तुझी बायको भलतीच चालू आहे तर!’’ राकेशला भयंकर राग आला. रोजच आई बहीण जयाबद्दल काही ना काही वाईट सांगत असतात. त्याअर्थी ते खरंच असलं पाहिजे, असे त्याला वाटले.

‘‘अहो, जेवायला वाढलंय, या.’’ असे म्हणून बोलवायला आलेल्या जयाला त्याने थाड थाड थोबाडीत मारून, लाथा-बुक्क्यांनी चेचून काढलं. ती पाच महिन्यांची गरोदर आहे हे माहीत असूनही त्याने आपल्या रागावर ताबा न ठेवता तिला बेदम मारलं. जया बिचारी रडत विचारत होती,‘‘का मारताय मला? असा मी काय गुन्हा केला?’’ पण… राकेशच्या मनात सैतान घुसला होता. तो उठला, घराबाहेर निघून गेला. थोड्या वेळाने परत आला तोच फुल्ल पिऊन. जया बेडरुममध्ये रडत झोपली होती. त्याने परत तिला मारबडव केली. जया बेशुद्ध पडली. ते पाहून त्याच्या आईने त्याला थांबवले, ‘‘अरे राकेश थांब. अशाने मरेल ती.’’ आणि तो थांबला.
राकेश तिच्यावर नजर ठेवून राहू लागला. त्याने तिच्याशी बोलणे कमी केले. सासू आणि नणंदेचे मात्र काही ना काही निमित्त करून तिला ओरडणे, शिव्या घालणे चालूच होते.
त्यानंतर थोड्याच दिवसांनी एका रविवारी सुट्टी असल्याने राकेश घरीच होता. सर्व घरकाम उरकून जया राकेश असलेल्या खोलीत येऊन त्याच्या शेजारीच बसली.

राकेश झोपेचे सोंग घेऊन पडला होता. जया त्याच्याकडे पाहत होती. हळूच उठून त्याच्या जवळ जावं आणि त्याच्या कुरळ्या केसांमधून हात फिरवावा, असं तिला वाटत होतं. तिला ते दिवस आठवले. लग्नानंतर राकेशने तिच्यावर खूप प्रेम केलं. तिचे आईवडीलही म्हणत होते,‘‘आमच्या जयाचं भाग्य थोर, म्हणून अशा श्रीमंत घरात पडली आमची जया.’’
सासू तर कौतुक करताना थकत नव्हती. राकेशने केलेले प्रेम आठवून ती स्वतःशीच लाजली. लाजतच तिने खिडकी बाहेर नजर टाकली. राकेश जागाच होता. तिचा लाजेने चूर झालेला चेहरा निरखत होता. ती खिडकी बाहेर पाहत हसतेय हे त्याने पाहिले आणि त्याच्यातला सैतान जागा झाला.

काय होतेय हे कळायच्या आतच त्याने ताडकन उठून जयाच्या केसांना धरून ओढले आणि तिच्या गालावर चपराक मारली. जयाच्या अंगावर धावून जात तो ओरडला,‘‘कुठे आहे तुझा तो यार? त्याच्याकडे पाहून दात काढताना लाज नाही वाटत?’’ असे बोलून त्याने कमरेचा पट्टा घेऊन तिला गुराला बदडल्यासारखे बदडले.

बिचार्‍या जयाचा काहीच दोष नसताना मार खाऊन ती निपचित पडली. तेवढ्याने राकेशचे समाधान झाले नाही तो उठला, घरात जाऊन त्याने पेटते कोलीत आणले आणि त्या अभागी जयाच्या शरीरावर आणि तोंडावर असंख्य चटके दिले. त्याच्या या क्रूर वागण्याने जया पूर्णपणे बेशुद्ध होऊन पडली. राकेशने तिला फरफटत ओढत आणून अंगणात टाकले व तो घरात निघून गेला. जया अंगणात पडली होती. रात्रीच्या गार वार्‍याने तिला शुद्ध आली तेव्हा तिला अंगावरच्या चटक्यांची जाणीव झाली. वेदनेने कळवळत तिने विहिरीकडे धाव घेतली. थंड पाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेतले.

पण थंड पाण्याने तिच्या सर्व अंगावर भले मोठे फोड आले. आता तिला आपल्या विद्रूपतेची कल्पना आली. चांगली माणसे, चांगले घराणे आहे असे समजून या घरात आपले लग्न लावणार्‍या आईबाबांची तिला कीव वाटली. आता कुठल्या तोंडाने जावे त्यांच्यापाशी? आपली ही दारुण दशा पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसेल, असे तिच्या मनात आले. आपले काहीच न चुकता या माणसांनी केवळ संशय घेऊन आपल्याला छळले.
हे विद्रूप तोंड घेऊन माहेरी तरी कसे जायचे? धड माहेरी जाता येत नाही आणि सासरचेही दार बंद. अशी करुण अवस्था तिची झाली.
रात्रीच्या त्या भयाण अंधारात वाट फुटेल तिकडे ती चालू लागली. जाता जाता एका नदीत तिने स्वतःला अर्पण केले.
एक निष्पाप फुल फुलण्याआधीच कोमेजून गेले. काय गुन्हा होता जयाचा? का तिच्या वाट्याला हे भोग आले? कोण देणार तिला न्याय? हाच का तो देवाघरचा न्याय? केवळ संशयावरून तिचा छळ केला गेला. याला राकेशची आई व बहीण जबाबदार आहेत. त्यांना शिक्षा होईलही कदाचित पण त्यामुळे आपली जया परत येणार का?