गोवा विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याचे वृत्त पसरल्याने सरकारसमोर पेच निर्माण झाला असून कोणत्याही परिस्थितीत दि. ८ जानेवारीपर्यंत गोवा विधानसभेची निवडणूक जाहीर होऊ नये म्हणून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू असल्याचे कळते.
कामत सरकारात वरील वृत्ताने खळबळ निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर काल संध्याकाळी दिल्लीला रवाना झाले. आज किंवा उद्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यास नोकरभरतीची प्रक्रिया अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांना गोव्याच्या निवडणुकीची तारीख जाहीर करणे लांबणीवर टाकणे शक्य होणार की नाही हे आज-उद्या स्पष्ट होऊ शकेल.
दरम्यान, आज दुपारी २.३० वाजता गोवा मंत्रिमंडळाची बैठक निश्चित केलेली आहे. सदर बैठक होणार की नाही हे मुख्यमंत्री दिल्लीहून आज दुपारपर्यंत गोव्यात परतले तरच कळू शकेल.
मध्यवर्ती ग्रंथालयाचे दि. ७ जानेवारी रोजी उद्घाटन करण्याचे ठरले आहे. त्यासाठी प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांना निमंत्रित करण्याची सरकारने तयारी केली होती. परंतु आचारसंहिता लागू झाल्यास ग्रंथालयाचे उद्घाटन लांबणीवर टाकावे लागणार आहे.