लाडोजी परब, पणजी
एक कर्तव्यदक्ष राजा ते भय कंपीत खलनायकाची भूमिका वठविणारा आणि दशावतारी कला सातासमुद्रापार नेऊन ठेवणारा एक सच्चा कलावंत बाबी कलिंगण! बुधवारी त्यांचे दशावतारी प्रयोगादरम्यानच निधन झाले. नाट्यकलेतील ‘राजा’ हरपल्याची खंत व्यक्त होत आहे.
पूर्वी दशावताराला कमी लेखण्याचा प्रयत्न नेहमी व्हायचा. ‘रात्री राजा, आणि दिवसा डोक्यावर बोजा’ असे समिकरण बनलेल्या दशावतारी नाट्यकलेला कलिंगण यांनीच खर्या अर्थाने मूर्तस्वरूप दिले. महादेव रामचंद्र ऊर्फ बाबी कलिंगण यांनी प्रथम दशावतारी कंपनीत बोजेवाल्याचेच काम केले. तीस ते चाळीस वर्षांपूर्वी ही कला उपेक्षितच होती. दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. बाबी कलिंगण यांचा जन्म कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील देसाईवाडीत झाला. लहानपणापासून त्यांना या कलेची आवड होती. पार्सेकर दशावतारी कंपनीत सुरूवातीला त्यांनी पेटारा उचलण्याचे काम सावळाराम नेरूरकर यांच्यासोबत केले. हे करत असताना इतर कलाकारांचे सादरीकरण पाहत ते घडत गेले. आणि नेरूर येथे एका नाटकात कैकयीच्या भूमिकेतून त्यांनी नाट्यकलेस प्रारंभ केला. त्यानंतर साकारलेल्या अनेक भूमिका त्यांनी जीवंत केल्या. वालावलकर दशावतार नाट्यकंपनीतून त्यांनी खर्या अर्थाने आपल्या नाट्यकारकीर्दीचा प्रारंभ केला. त्यानंतर खानोलकर, मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर या दशावतारी कंपनीत त्यांनी काम केले. काही वर्षापूर्वीच त्यांनी कलेश्वर दशावतार नाट्यकंपनी ही स्वतंत्र नाट्यसंस्था स्थापन केली होती. त्यांच्या विशेष गाजलेल्या ‘मारूती’ शंकराच्या भूमिका विशेष गाजल्या. बाबी कलिंगण यांचा दशावतारी नाटकातील राजा जसा भारदस्त होता, तसा धनगर, कोळी, गरूड या भूमिकाही तेवढ्याच ताकदीने ते साकारत. लिखित नाट्यसंहिता नसतानाही प्रसंगानुरूप हावभाव आणि संवाद फेकण्याचे सामर्थ्य खर्या कलावंतात असते, ते बाबी कलिंगण यांच्याकडे होते. त्यासाठीच १९९४ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाचा लोककला पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला होता. महाराष्ट्राबरोबरच गोव्यातही त्यांनी बरेच नाव कमावले. बॅकस्टेज आर्टिस्ट ते उत्तम अभिनय कला असलेले कलिंगण आज आपल्यात नाहीत, तरीही त्यांचा अभिनय प्रत्येक नाट्यकलाकाराला काहीतरी नवीन शिकवून जातो. कर्नाटकातील ‘यक्षगान’ या लोककलेशी साधर्म्य असलेला दशावतार आज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला. कोकणात एकूण ३७ लोककला प्रकार आहेत. त्यातला महत्त्वाचा कलाप्रकार म्हणजे दशावतार. दशावताराचे नाते हे दहिकाल्याशी जोडले गेलेले आहे. त्यामुळेच नोव्हेंबरपासून सुरू होणारे नाट्यप्रयोग फेब्रुवारी पर्यंत सर्रास चालतात. कुठलाही जत्रोत्सव दशावतारी नाटकाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. बाबी कलिंगण यांच्या नावातच जादू होती. त्यांच्या नाट्यप्रयोगांना प्रेक्षकांची एकच गर्दी व्हायची. या कलेची सेवा करतानाच चंदगड येथे त्यांची प्राणज्योत मालवली. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी नाट्यकलेसाठी घालविले.