>> मडगाव स्थानकाचाही समावेश
भारतीय रेल्वे येत्या दि. १२ मेपासून टप्प्याटप्प्याने देशातील निवडक अशा १५ मार्गांवरील रेलसेवा सुरू करणार आहे. या अंतर्गतच्या ट्रेन्स विशेष ट्रेन्स स्वरुपात नवी दिल्ली येथून धावणार आहेत.
गोव्यातील मडगाव रेल स्थानकावरूनही ही विशेष ट्रेन जोडली जाणार असल्याचे वृत्त आहे. नवी दिल्लीहून या विशेष ट्रेन्स दि ब्रुगड, अगरताळा, हावडा, पाटणा, विलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपूरम, मडगाव, मुंबई मध्य, अहमदाबाद व जम्मू या शहरांमध्ये धावणार आहेत.
देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेल्या २५ मार्चपासून देशभरातील प्रवासी रेलसेवा बंद झाली होती. यानंतर आता १२ मेपासून विशेष ट्रेन्स सुरू होणार आहेत १५ निवडक मार्गांवर रेलसेवा सुरू झाल्यानंतर आणखी नव्या मार्गांवर अशाच विशेष ट्रेन्स सुरू केल्या जाणार आहेत. कोविड-१९ सेवा केंद्रांसाठी २०,००० डबे राखून ठेवल्यानंतर डब्यांच्या उपलब्धतेनुसार आणखी नव्या मार्गांवर विशेष ट्रेन्स सुरू केल्या जातील असे या वृत्तात म्हटले आहे.
या विशेष ट्रेन्ससाठीचे आरक्षण आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर ११ मे रोजी संध्या. ४ पासून सुरू होणार आहे. तर रेल्वे स्थानकांवरील आरक्षण काऊंटर्स बंद ठेवले जाणार आहे. प्लॅटफॉर्म तिकीटेही तेथे दिली जाणार नाहीत.
तसेच ज्यांच्या तिकिटांचे आरक्षण निश्चित झालेले आहे अशा प्रवाशांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. प्रवाशांना चेहर्यावर मास्क घालणे बंधनकारक राहील.