नियोजनबद्ध प्रचारासाठी समन्वय समिती

0
4

>> इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी ठाकरेंची माहिती; काँग्रेसच्या विजयासाठी एकजुटीने काम करणार

इंडिया आघाडीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या एकंदर रणनीतीवर चर्चा करण्यात आली. याशिवाय नियोजनबद्ध प्रचार कार्यासाठी आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेली एक समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल दिली. इंडिया आघाडीच्या पणजीतील बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या इंडिया आघाडीच्या पहिल्या संयुक्त बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगश, आमदार क्रूझ सिल्वा, काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, शिवसेना ठाकरे गटाचे जितेश कामत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे डिसोझा आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नियोजनासाठी सर्व पक्षांशी योग्य समन्वय साधला जाणार आहे. भाजपच्या कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे गोव्यातील जनता सुध्दा भाजपच्या प्रलोभनांना बळी पडणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाच्या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांवर बैठकीत चर्चा झाली नाही. उमेदवार छाननी समितीने संभाव्य उमेदवारांची नावे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे सादर केली असून त्या समितीकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

आरजीपी ही भाजपची ‘बी’ टीम
आरजीपी ही भाजपची बी टीम आहे. कॉँग्रेसच्या मतांची विभागणी करण्यासाठी भाजपने आरजीपीला निवडणूक रिंगणात उतरले आहे, असा दावा माणिकराव ठाकरे यांनी केला. आरजीपीला खरोखरच भाजपच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर त्यांनी कॉँग्रेस पक्षासोबत आले पाहिजे. गोव्यातील मतदारांनी आरजीपीचा खरा चेहरा ओळखला आहे. त्यामुळे मतदार काँग्रेसला निश्चित साथ देईल, असेही ठाकरे म्हणाले.

आमदार वीरेश बोरकर काय म्हणाले?
गोव्यात होणाऱ्या इंडिया आघाडीमध्ये आरजीपी हा प्रादेशिक पक्ष सहभागी झालेला नाही, असे आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. इंडिया आघाडीबाबत निर्णय घेण्यास उशीर झाला. आरजीपीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार आधीच जाहीर केले आहेत, असेही बोरकर यांनी सांगितले.