नियंत्रण रेषेपलीकडे भारताची धडक कारवाई

0
93

 

>> दहशतवाद्यांचे किमान सात तळ उद्ध्वस्त
>> लष्कराच्या कमांडोंची नियोजनबद्ध कारवाई
>> पाकिस्तानची प्रत्युत्तराची धमकी

पाकिस्तानमधून सतत होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांना खमके प्रत्युत्तर देत काल भारतीय लष्कराने दोन्ही देशांदरम्यानची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांचे किमान सात अड्डे उद्ध्वस्त केले. बिंबर, हॉट स्प्रिंग्स, केल व लिपा सेक्टरमध्ये ही कारवाई झाली. लष्कर ए तोयबा, जैश ए महंमद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन आदी विविध दहशतवादी संघटनांचे हे अड्डे असल्याचे सांगण्यात येते. येथून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास पाठवले जात असे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची काल सकाळी तातडीची बैठक झाली. त्यानंतर वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल रणबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत या लष्करी कारवाईची घोषणा केली. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. हे दहशतवादी घातपात घडवण्यासाठी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत होते असे त्यांनी सांगितले. या कारवाईत जवळजवळ पस्तीस ते चाळीस दहशतवादी आणि नऊ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे ते म्हणाले. ‘‘ही कारवाई आता संपुष्टात आली आहे’’ असेही त्यांनी जाहीर केले. ‘‘हे हल्ले दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या पाठीराख्यांविरुद्ध होते’’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाकिस्तानने त्यांच्या नियंत्रणाखालील भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होऊ देऊ नये असे वारंवार आवाहन करूनही पाकिस्तानने प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करणे भाग पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी मध्यरात्री सुरू झालेली ही लष्कराची धडक कारवाई गुरुवारी पहाटे साडे चार वाजेपर्यंत चालली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील दहशतवाद्यांचे अड्डे या कारवाईत लक्ष्य करण्यात आले. गेला आठवडाभर त्यांची टेहळणी सुरू होती. हेलिकॉप्टर आणि पायदळाद्वारे ही कारवाई करण्यात आली. लष्कराचे खास कमांडो हेलिकॉप्टरमधून त्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरवण्यात आले. भारताच्या बाजूने कोणतीही हानी झालेली नाही.
दरम्यान, पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) ने भारताने बिंबर, हॉटस्प्रिंग, केल व लिपा सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजूने कारवाई केल्याची कबुली दिली आहे.
पाकिस्तानकडून प्रत्युत्तर दिले जाण्याचा धोका असल्याने पंजाबच्या पाकिस्तान सीमेवरील जिल्ह्यांतील गावांतील नागरिकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. पंजाबचे अमृतसर, गुरुदासपूर, तरण तारण, फिरोजपूर, फरिदकोट, अबोहर व फाजिल्का हे सीमावर्ती जिल्हे आहेत. पाकिस्तानशी पंजाबची ५५३ किलोमीटरची सीमा भिडलेली आहे. सीमा सुरक्षा दलाने सीमेवर गस्त वाढवली असून सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
या हल्ल्यानंतर सरकारतर्फे सर्व राजकीय पक्षांना विश्‍वासात घेण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व प्रमुख राजकीय नेत्यांशी व मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना या कारवाईची माहिती दिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू काश्मीरचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनाही या कारवाईची माहिती देण्यात आली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची एक बैठक घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीबाबत चर्चा केली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपार जाऊन कारवाई करण्यापूर्वी भारताने पाकिस्तानला जागतिक पातळीवर राजनैतिकदृष्ट्या एकटे पाडले. इस्लामाबादेत होणार्‍या सार्क परिषदेवर भारताने बहिष्कार टाकताच अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका या देशांनीही भारताच्या बाजूची भूमिका घेतल्याने ही आक्रमक कारवाई करण्याची संधी भारताने साधली. ही कारवाई केवळ दहशतवाद्यांविरुद्ध असून पाकिस्तानी सेनेविरुद्ध नसल्याची भूमिका भारताने घेतली आहे. ती पाकव्याप्त काश्मीरपुरती व त्यातही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागापुरती सीमित ठेवण्यात आली. प्रत्यक्ष पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला चढवला गेलेला नाही. या कारवाईचे चित्रीकरण करण्यात आल्याचे समजते. गेल्या १८ सप्टेंबरला उरीतील लष्करी मुख्यालयावर चार दहशतवाद्यांनी हल्ला चढवल्याने १८ जवान शहीद झाले होते. त्यानंतर उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे.

अशी झाली कारवाई

  • बुधवारी रात्री १२.३० वाजता कारवाईस सुरूवात.
  • बिंबर, हॉटस्प्रिंग, केल व लीपा सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय लष्करी कमांडो दाखल झाले.
  • प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे ५०० मीटर ते दोन कि. मी. अंतरातील दहशतवाद्यांच्या तळांवर आकस्मिक हल्ला चढवला गेला.
  • दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त, ३८ दहशतवादी व दोन पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहिती.
  • हेलिकॉप्टरांचाही कारवाईत वापर.
  • पहाटे ४.३० वाजता कारवाई आटोपली.