नितीशनंतर अखिलेश यांचीही काँग्रेस पक्षावर जोरदार टीका

0
2

केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव आणि बिहारमधील मुख्यमंत्री नितीशकुमार या दोघांनीही काँग्रेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे सातत्याने काँग्रेसवर टीका करत असून रविवारीही मध्य प्रदेशात एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसला कपटी पक्ष म्हणत जोरदार टीका केली. यादव यांनी, काँग्रेस पक्षाबाबत नेहमी सावधगिरी बाळगा. ते आमचा विश्वासघात करू शकतात. अशी टीका केली आहे. मध्य प्रदेशात जागावाटपावरुन मतभेद झाल्यानंतर अखिलेश यादव काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. अखिलेश यांनी शनिवारीही मध्य प्रदेशात एका रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

नितीशकुमारांचीही टीका
‘इंडिया’ आघाडीबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. इंडिया आघाडीच्या पुढील वाटचालीबद्दल फारशी प्रगती झालेली नाही. काँग्रेस पक्ष पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येच अधिक रस घेत आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीबाबत फारशी चिंता दिसत नाही, अशी टीका नितीशकुमार यांनी केली होती.