निखत, दीपकचे पदक निश्‍चित

0
124

माजी ज्युनियर विश्‍वविजेती निखत झरीन (५१ किलो) व आशियाई रौप्यदक विजेता दीपक सिंग (४९ किलो) यांनी काल बुधवारी थायलंड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताची किमान दोन कांस्यपदके पक्की केली. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या निखतने काल उझबेकिस्तानच्या सितोरा शोगदारोवा हिचा ५-० असा पराभव केला. पुरुषांमध्ये दीपकला विजयासाठी काही मिनिटेच लागली. दीपकच्या ठोशांनी थायलंडच्या सामक सिहान याच्या कपाळातून रक्त वाहू लागल्याने रेफ्रींनी पहिल्याच फेरीत सामना थांबवत दीकपच्या बाजूने निकाल दिला. आशिष (६९ किलो), मंजू राणी (४८ किलो), ब्रिजेश यादव (८१ किलो) व राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता हुसामुद्दीन (५६ किलो) यांनी पदक फेरीत प्रवेश केला. आशिषने जमैकाच्या जोशुआ फ्राझियर याला ५-० असे तुडविले. हुसामुद्दीनने आपला कोरियन प्रतिस्पर्धी ली येचान याला अस्मान दाखवताना आपल्या अचूकतेच्या बळावर ५-० असा सामना जिंकला. ब्रिजेशला मात्र थायलंडच्या जक्का पोंग योमखोत याच्याविरुद्ध थोडा घाम गाळावा लागला. परंतु, अखेरीस त्याने ४-१ अशी बाजी मारली. मंजूने इटलीच्या रॉबर्टा बोनाटीचा फडशा पाडला. मनीषा मौन (५७ किलो) हिला मात्र रशियाच्या लुईडमिला वारोंतसोवा हिच्याकडून पराभूत व्हावे लागले.

मोनिका, जमुना बोरो प्रभावी
इंडोनेशियातील लाबुआन बाजो येथे सुरू असलेल्या २३व्या अध्यक्षीय चषक स्पर्धेत मोनिका (४८ किलो) हिने यजमान देशाच्या निस अँजेलिना हिचा ५-० असा खुर्दा उडविला. इंडिया ओपनच्या सुवर्णपदक विजेत्या जमुना बोरोने थायलंडच्या इंकाम जीरापार्कला ५-० असे पराजित करत उपांत्य फेरीत धडक दिली. नीरज स्वामी (४९ किलो) व दिनेश डागर (६९ किलो) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आपले पदक यापूर्वीच निश्‍चित केले आहे. २८ जुलैपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत मेरी कोम भारताच्या १० सदस्यीय संघाचे नेतृत्व करत आहे.