गगनझेप!

0
131

‘चांद्रयान-२’ ला चंद्रावर नेण्यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ प्रक्षेपकाने प्रत्येक भारतीयाची छाती अगदी अभिमानाने भरून यावी अशी दमदार गगनझेप काल दुपारी ठीक २.४३ वाजता घेतली. ‘चांद्रयान-२’ सह हा प्रचंड आकाराचा ‘बाहुबली’ प्रक्षेपक पूर्वनियोजनानुसार अगदी सेकंदाबरहुकूम पृथ्वीच्या कक्षेपर्यंत ‘चांद्रयाना’ला सोडण्यासाठी ‘इस्रो’मधील मोठ्या पडद्यावर इंच इंच पुढे सरकत चाललेला दिसत असताना अवघा देश श्वास रोखून त्याचा तो प्रवास पाहात होता. आठ दिवसांपूर्वीच होऊ घातलेले त्याचे प्रक्षेपण ऐनवेळी त्यात तांत्रिक समस्या उद्भवल्याने रद्द करावे लागल्याने दुसर्‍यांदा होत असलेल्या या प्रक्षेपणाच्या यशस्वीततेबाबत सर्वांच्याच मनात नाही म्हटले तरी थोडी धाकधूक होती. त्यामुळेच राष्ट्रपती, पंतप्रधान आदी महनीय व्यक्तींनी आपापल्या दालनातूनच हे प्रक्षेपण पाहणे पसंत केले. परंतु ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचा दुर्दम्य ध्येयवाद एवढा की सारे तांत्रिक दोष अत्यंत वेगाने दूर करून आठवड्याच्या आत हा प्रक्षेपक अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज करण्यात आला आणि अगदी काटेकोर नियोजनानुसार त्याने बघता बघता ‘चांद्रयान-२’ ला पृथ्वीच्या कक्षेमध्ये नेऊन सुखरूप पोहोचवले. नियोजित पथ आणि या प्रक्षेपकाचा प्रत्यक्षातील प्रवास यामध्ये एका सेंटीमीटरचाही फरक नव्हता यावरून ‘इस्रो’चा या क्षेत्रातील अधिकार आणि कौशल्य यांची साक्ष पटते. ‘चांद्रयाना’च्या या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर प्रक्षेपकापासून विलग होणारे वेगवेगळे भाग प्रत्यक्ष कॅमेर्‍यात चित्रित झालेले पाहणे हा तर थरारक अनुभव होता. बघता बघता त्याने आपण जेथून आलो त्या पृथ्वीचे छायाचित्रही टिपले आणि जणू तिला अलविदा केला! अर्थात, हे या मोहिमेचे केवळ पहिले पाऊल आहे. अजून त्याला बराच प्रवास करायचा आहे. चंद्रापर्यंत जायचे आहे, चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत शिरायचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यातला ‘विक्रम’ हा ‘लँडर’ थेट चंद्रावर उतरणार आहे. त्यानंतर त्या लँडरमधले रोव्हर ‘प्रग्यान’ प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभूमीवर पंधरवडाभर विविध प्रयोग करणार आहे. हे सगळे नियोजनाबरहुकूम व्हावे अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा जरी असली आणि ‘इस्रो’ने त्यासाठी नियोजनावर अपार मेहनत जरी घेतलेली असली, तरी शेवटी मानवी क्षमतेपलीकडील अनेक आव्हानांचा सामना करीत ही सगळी कामगिरी पार पाडायची असल्याने ती सुखरूप पार पडावी आणि भारताचा तिरंगा चंद्रावर उतरावा अशी कामना व्यक्त करणेच या घडीस आपल्या हाती आहे. परंतु ‘इस्रो’चा आजवरचा इतिहास, त्यांच्या संशोधनाचा चाललेला प्रवास आणि आपल्या भारतीय शास्त्रज्ञांची तीव्र बुद्धिमत्ता या सगळ्यामुळे ही कामगिरी ‘चांद्रयान-२’ निश्‍चितपणे फत्ते करील असा दृढ विश्वास प्रत्येक भारतीयाला आहे. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आपण आजवर कुठून कुठवर आलेलो आहोत. खरोखरच हा सारा प्रवास अतिशय विस्मयकारक व अकल्पनीय वाटावा असाच आहे. साठच्या दशकामध्ये सायकलवरून नेण्यात येणारा छोटासा प्रक्षेपक कुठे, बैलगाडीवरून नेला जाणारा उपग्रह कुठे आणि चंद्र आणि मंगळावरच्या या हजारो कोटी खर्चाच्या मोठमोठ्या मोहिमा कुठे! ‘इस्रो’च्या या दुसर्‍या चांद्रयान मोहिमेत प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार असलेल्या लँडरला ‘विक्रम’ हे ‘इस्रो’चे प्रणेते विक्रम साराभाई यांचे नाव देऊन फार मोठे औचित्य दाखवले गेले आहे. ‘इस्रो’ ने भारताची मान आपल्या एकेक कामगिरीने जगामध्ये उंचावली आहे. प्रक्षेपक असोत, उपग्रह असोत अथवा चंद्र, मंगळावरच्या या मोहिमा असोत, अमेरिकेच्या ‘नासा’च्या तोडीस तोड अशा मोहिमा, परंतु त्याच्या वीस पट कमी खर्चामध्ये पार पाडणे ही खरोखरच अतुलनीय कामगिरी आहे. सध्याच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेवरचा खर्च हा नुकत्याच येऊन गेलेल्या ‘ऍव्हेंजर्सः एंड गेम’ या हॉलिवूडपटापेक्षाही कमी आहे. हे अभिमानास्पद नाही काय? भारतासारख्या गरीब देशाला कशाला हव्यात एवढ्या खर्चिक मोहिमा? असा एक रडतराऊत सूर काही मंडळी लावत असतात. कवि नारायण सुर्वे म्हणतात तसे, ‘भरल्या पोटाने अगा पाहतो जर चंद्र, आम्हीही कुणाची याद केली असती’ हे खरे आहे, परंतु त्याच बरोबर भारताची अफाट बुद्धिमत्ता तिला वाव न देताच वाया घालवायची का, विदेशी स्वप्ने साकार करण्यासाठी जाऊ द्यायची का, हाही प्रश्न आहेच. एक काळ होता जेव्हा आपली बुद्धिमत्ता देशात कर्तृत्वाला वाव नसल्याने विदेशांत चालली होती. ‘ब्रेन ड्रेन’ची समस्या निर्माण झाली होती. परंतु पं. जवाहरलाल नेहरूंपासून आजवर ही बुद्धिमत्ता भारतातच राहावी आणि तिने भारतीयांचे हित साधावे यासाठी जे मौलिक प्रयत्न झाले, त्यातूनच ‘इस्रो’ सारखी संस्था घडू शकली. आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी ती पार पाडते आहे. ‘चांद्रयान-२’ जेव्हा सप्टेंबरच्या पहिल्या वा दुसर्‍या आठवड्यात प्रत्यक्ष चंद्रावर उतरेल, तेव्हा तो क्षण तुमच्या – आमच्या डोळ्यांचे पारणे फेडणाराच असेल यात शंका नाही. त्या मंगल दिवसाची आता प्रतीक्षा करूया!