नारायण राणेंची ‘नवी दिशा’

0
174

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मातब्बर नेते श्री. नारायण राणे यांनी अखेर नवरात्रांच्या घटस्थापनेदिवशी म्हणजे उद्या गुरुवारी आपली ‘नवी दिशा’ जाहीर करण्याची घोषणा कुडाळच्या कार्यकर्ता मेळाव्यात केली. गेले सात – आठ महिने त्यांच्या भाजप प्रवेशावरून महाराष्ट्राचे राजकारण रंगले आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाल्याने कॉंग्रेसने त्यांना न विचारता परस्पर सिंधुदुर्गातील संपूर्ण कॉंग्रेस जिल्हा समिती व बूथ समित्या बरखास्त करून नवा जिल्हाप्रमुख नेमला. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते नारायण राणे यांना भाजपात प्रवेश देण्यास उत्सुक असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी त्याला विरोध चालवला आहे. त्यातच भरीस भर म्हणजे शिवसेनेने नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली तेज होताच महाराष्ट्रातील सरकारमधूनच बाहेर पडण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे या सगळ्या धुमश्चक्रीत राणे कोणती ‘दिशा’ स्वीकारतात हे उद्या स्पष्ट होईल. नारायण राणे हे फार महत्त्वाकांक्षी नेते आहेत, त्यामुळे ते वेळोवेळी प्रत्येकाला डोईजड ठरत आले आहेत आणि त्यांच्या त्या महत्त्वाकांक्षेला आवर घालण्याचा प्रयत्नही वेळोवेळी होत आला आहे. राणेंनी शिवसेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ केला आणि नऊ आमदारांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेशले तेव्हा सत्ता येताच सहा महिन्यांत मुख्यमंत्री करू असे आश्वासन म्हणे त्यांना देण्यात आले होते. परंतु ते घडले नाही. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी आलेल्या विलासराव देशमुखांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. पण विलासरावांच्या जागी अशोक चव्हाण आले. पुढे अशोक चव्हाण ‘आदर्श’ प्रकरणात गेले, तेव्हा त्यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण आले, परंतु राणेंची डाळ काही शिजलीच नाही. गेल्या निवडणुकाही पृथ्वीराज चव्हाणांच्याच नेतृत्वाखाली लढवायचा निर्णय पक्षाने घेतला तेव्हा राणेंची कॉंग्रेस पक्षात उपेक्षा चालली आहे हे पुरेपूर स्पष्ट झाले. राणेंनी पहिल्यांदा आपले उद्योगमंत्रीपद सोडून कॉंग्रेसविरुद्ध बंड पुकारले तेव्हा सहानुभूती मिळणे दूरच, उलट निलंबनाची कारवाई ओढवून घेतली होती. माफीनाम्यानंतरच ते निलंबन मागे घेतले गेले. नंतर त्यांना महसूलमंत्रिपद देण्यात आले तरीही राणेंच्या महत्त्वाकांक्षेने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर त्यांनी अहमदाबादेत अमित शहांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या, तेव्हापासून राणे कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना रंग भरला. राणेंनी पहिल्या वेळी जेव्हा बंड केले, तेव्हाही राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अशाच रंगल्या होत्या. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची दारे सर्वांनाच खुली नाहीत. ‘फिल्टर लावला जाईल’ असे सूचक वक्तव्य केले होते. आता तर फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि राणेंसारखा ग्रह त्यांना आपल्या कुंडलीत हवा असणे शक्य नाही. त्यामुळे नितीन गडकरींपासून अमित शहांपर्यंत केंद्रीय नेत्यांना जरी राणेंसारखा प्रबळ मराठा नेता आपल्याकडे आला तर कोकणातच नव्हे, तर महाराष्ट्रात भाजपा बहुजन समाजात बळकट होईल असे वाटत असले, तरी अनेक तत्वनिष्ठ भाजपा नेते आणि कार्यकर्ते त्याविरुद्ध उभे राहिले आहेत. त्यामुळेच राणेंचा भाजप प्रवेश एवढे महिने लटकला आहे. भाजपाचे काही नेते राणेंना पक्षात प्रवेश देऊ पाहात आहेत त्यात कॉंग्रेसलाच नव्हे, तर शिवसेनेला धडा शिकवण्याचा सुप्त हेतूही आहे. भाजपाने सध्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला डोळ्यांपुढे ठेवून सर्वत्र ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ची मोहीम चालवलीच आहे. गोव्यात ज्या प्रमाणे विश्वजित राणेंना भाजपात प्रवेश दिला गेला तेव्हा त्यांच्यावर आधी केलेले सगळे आरोप एका रात्रीत धुवून निघाले, तसेच नारायण राणेंच्या बाबतीत होणे असंभव नाही. शेवटी भाजपा नेतृत्वाला सध्या तत्त्वे, मूल्ये यापेक्षा संख्या महत्त्वाची वाटू लागली आहे आणि त्यातूनच हे बेरजेचे राजकारण देशभरात सुरू आहे. फडणविसांनी सांगितलेला फिल्टर सध्या गुंडाळून ठेवला गेला आहे असेच दिसते आहे. स्वतःचे राजकीय भवितव्य संपुष्टात येते आहे या जाणिवेने धास्तावलेले अन्य पक्षीय नेते मग उगवत्या सूर्याला दंडवत ठोकून भाजपामय होत चालले आहेत. नारायण राणे आणि त्यांचे दोघे सुपुत्र यांचा भाजप प्रवेश फडणविसांच्या आणि शिवसेनेच्या कोलदांड्यामुळे कितपत दुष्कर होईल, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हट्टाग्रहापुढे पक्षाचे स्थानिक नेते मुकाट मान तुकवतील का, कॉंग्रेसने आधीच निकालात काढले असलेले राणे या परिस्थितीत काय करतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेने गेल्या वेळी राणे पिता पुत्रांचा सिंधुदुर्गातील वरचष्मा मोडून काढला. त्यामुळे प्रभाव ओसरत चाललेल्या राणेंना आता भाजपाने स्वीकारले तर त्यांच्यासाठी ती नवसंजीवनी ठरू शकेल, परंतु ही त्यांची ‘नवी दिशा’ उपेक्षित सिंधुदुर्गाचे हित साधणार की केवळ राणे पिता-पुत्रांचे याचे उत्तरही तितकेच महत्त्वाचे असेल.