ट्रम्प यांचा इशारा आणि नवी जागतिक समीकरणे

0
125
  • शैलेंद्र देवळाणकर

संयुक्त राष्ट्रांपुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला उद्ध्वस्त करण्याचा इशारा नुकताच दिला. जागतिक स्तरावर चीन – रशिया – पाकिस्तान अशी युती होत असताना दुसरीकडे अमेरिका – जपान – भारत एकत्र आले आहेत. काय होणार याचा परिणाम?

संयुक्त राष्ट्र संघांच्या आमसभेचे ७२ वे अधिवेशन सध्या न्यूयॉर्क येथे सुरू आहे. जवळपास ८ दिवस हे अधिवेशन चालते. संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा हे राष्ट्राराष्ट्रांमधील संवादासाठीचे एक मोठे जागतिक व्यासपीठ आहे. यावर्षीचे अधिवेशन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतरचे हे पहिले अधिवेशन आहे. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवरही हे अधिवेशन वेगळे ठरणार आहे. यातील पहिली घडामोड आहे ती उत्तर कोरियाची. उत्तर कोरियाकडून वारंवार होणार्‍या अणुपरीक्षणामुळे आणि क्षेपणास्र चाचण्यांमुळे संपूर्ण आशिया खंडातील वातावरण हे कमालीचे असुरक्षित आणि अशांत बनले आहे. दुसरीकडे डोकलामच्या प्रश्‍नावरुन भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष नुकताच थंडावलेला आहे. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच अमेरिकेच्या अङ्गगाणिस्तान आणि पाकिस्तान विषयीच्या धोरणांची घोषणा केली आहे. या धोरणामध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणारा, आसरा देणारा आणि निर्यात करणारा देश असे थेटपणाने संबोधले आहे. दहशतवाद्यांसाठीचे एक अत्यंत सुरक्षित स्थान म्हणून त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला आहे. अशा प्रकारची उघड टीका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून पहिल्यांदाच झाली आहे. त्याचबरोबर जे देश दहशतवादाला खतपाणी घालत आहेत त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
गेल्या ७० वर्षांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कार्याचे आणि योगदानाचे परीक्षण आणि मूल्यमापन केल्यास एक गोष्ट स्पष्टपणाने जाणवते की, ज्या उद्दिष्टांसाठी संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यात आली होती ती पूर्ण करण्यात या संघटनेला अपयश आले आहे. या संघटनेचे एकमेव योगदान म्हणजे तिने आजवर तिसर्‍या महायुद्धाच्या धोक्यापासून जगाला वाचवले आहे. मात्र आज ज्याप्रमाणे जागतिक राजकारणाची समीकरणे बदलताना दिसत आहेत त्यावरुन एका वेगळ्या शीतयुद्धाची नांदी निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या शीतयुद्धामध्ये एका बाजूला चीन-रशिया-पाकिस्तान एकत्र येताना दिसत आहेत, तर दुसरीकडे अमेरिका-जपान आणि भारत यांसारखे देश एकत्र येताना दिसत आहेत. यापूर्वीच्या शीतयुद्धांमध्ये अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी पाकिस्तान सोव्हिएत रशियाच्या विरोधामध्ये अमेरिका आणि पश्‍चिम युरोपिय देशांना मदत करताना दिसत होता. पण आता अमेरिकेने उघडपणाने विरोधात भूमिका घेतल्यामुळे आणि पाकिस्तानला देण्यात येणारी मदत रोखल्यामुळे त्यांना चीनच्या जवळ जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सध्या चीन आणि रशिया एकत्र आलेले आहेत. कारण रशियाच्या विरोधामध्ये अमेरिका आणि युरोपियन देशांनी आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे एक नवे सत्तासमीकरण आकाराला येताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाचे हे अधिवेशन होत आहे.
या अधिवेशनामध्ये डोनाल्ड ट्रम्प काय बोलणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागून राहिलेेले होते. अपेक्षेप्रमाणे ट्रम्प यांनी ४० मिनिटांचे आक्रमक भाषण केले आणि त्यातील बहुतांश भाग उत्तर कोरियावर होता. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा आणि हुकुमशहा किम जोन याचा उल्लेख ट्रम्प यांनी ‘रॉकेट मॅन’ असा केला. त्याचबरोबर अमेरिका संयमाने, धीराने वागत असली तरी आमच्यावर अथवा आमच्या सहकार्‍यांवर, युती भागीदारांवर हल्ला झाला तर अमेरिका उत्तर कोरियाला पूर्णतः उद्ध्वस्त करायला मागेपुढे पाहणार नाही. जर किमला स्वतःचे राज्य वाचवायचे असेल तर हे तात्काळ थांबवायला हवे, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.
उत्तर कोरियाला आण्विक तंत्रज्ञान हे पाकिस्तानकडून पुरवले गेले आहे. १९९८ मध्ये पाकिस्तानने आण्विक साधनसामग्री, तंत्रज्ञान आणि सुटे भाग उत्तर कोरियाला ए. क्यू. खानच्या माध्यमातून पुरवले गेले होते. हे प्रकरण २०११ मध्ये उघडकीस आले. पाकिस्तान हा सातत्याने उत्तर कोरियाला अशा प्रकारचा पुरवठा करत आहे. त्यामुळे उत्तर कोरियावर निर्बंध टाकत असताना ज्या-ज्या देशांनी उत्तर कोरियाचा अण्वस्र कार्यक्रम पुढे नेण्यास हातभार लावला त्यांच्यावरही कारवाई केली जावी, अशी भूमिका भारताने घेतली आहे. आमसभेमध्ये सुषमा स्वराज हीच भूमिका मांडण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तान हा जागतिक पातळीवर एकाकी पडला आहे. आजवर अमेरिका हा पाकिस्तानचा खंदा पाठीराखा होता. प्रत्येक गोष्टीसाठी पाकिस्तान अमेरिकेच्या पाठिशी लपत आला आहे, तसेच अमेरिकाही दहशतवादाच्या प्रश्‍नावरुन पाकिस्तानकडे डोळेझाक करत राहिला. मात्र ट्रम्प यांनी पाकिस्तान अङ्गगाणिस्तानमध्ये कशा प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे यावर उघडपणाने बोट ठेवले आणि आता उत्तर कोरियाला पाकिस्तान कशा प्रकारे मदत करत आहे हेही उघड झाले आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांच्या अङ्गगाणिस्तान धोरणातूनही पाकिस्तानविरोधी सूर स्पष्ट झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभांमध्ये पाकिस्तान कोलांटउडी खात भारतावरच आरोप करताना दिसायचा. यावेळी मात्र त्यांची अशी भूमिका कोणीही गांभीर्याने घेणार नाही. परिणामी, पाकिस्तान अधिक एकाकी पडेल. मात्र हा एकटा पडलेला पाकिस्तान चीनच्या अधिक जवळ जाईल आणि त्यातून चीन-रशिया आणि पाकिस्तान अशी युती जागतिक मंचावर उघडपणाने उदयास येईल आणि त्यातून एका नव्या शीतयुद्धाला तोंड ङ्गुटते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तर कोरियाच्या प्रश्‍नासंदर्भात भारताने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. भारताने उत्तर कोरियासोबतचे सर्व व्यापारी संबंध पूर्णपणाने रद्द केले आहेत. त्याचबरोबर भारताने उत्तर कोरियाच्या अणुपरीक्षणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. चीन, ङ्गिलीपाईन्स या देशांनंतर भारत हा उत्तर कोरियाचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताकडून अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातील प्रशिक्षण मोठ्या प्रमाणावर उत्तर कोरियाला दिले जाते. २०१५ मध्ये उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री भारतभेटीवर आले होते. त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. २००२ पासून भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यान्न आणि औषधांची निर्यात उत्तर कोरियाला करत आहे. खनिज संपत्ती, तेल, कपडे, विद्युत यंत्रसामुग्री, नैसर्गिक वायू या गोष्टी भारत उत्तर कोरियाकडून आयात करत होता. उत्तर कोरियासोबतचा भारताचा व्यापार हा सुमारे ८७ दशलक्ष डॉलर्स इतका होता. आता हा पैसा थांबला आहे. याचा परिणाम उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमावर होणार आहे. त्यामुळे भारताच्या या निर्णयाची प्रशंसा सर्वत्र होत आहे. यामुळे भारत अमेरिका आणि जपानच्या अत्यंत जवळ गेला आहे. कारण हे दोन्ही देश उत्तर कोरियाचे शत्रू आहेत. सारांशाने विचार करता या सर्वांमधून एक नवी युती आकाराला येत असून त्याचे प्रतिबिंब या आमसभेमध्ये पडते आहे.