नारायण राणेंचा कॉंग्रेस पक्षाला रामराम

0
182

 

>> आमदारकीचाही दिला राजीनामा
>> दसर्‍यापूर्वी ठरवणार पुढील दिशा

मुख्यमंत्रीपदाचे आश्‍वासन देऊनही कॉंग्रेसने ते पाळले नाही. त्याचबरोबर तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच कॉंग्रेस सोडतो, असे म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिग्गज नेते नारायण राणे यांनी काल १२ वर्षांनंतर कॉंग्रेस पक्षाला कायमचा रामराम ठोकला. तसेच राणे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला.
‘आज आम्ही कॉंग्रेसमुक्त झालो आहोत. आता आमचा कॉंग्रेसशी काहीही संबंध नाही’, असे राणे कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. आपण दुपारी दोन वाजता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा तर विधानपरिषद सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला आहे, असे राणे यांनी सांगितले. निलेश राणे यांनीही कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. काल झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी व सदस्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडला. कॉंग्रेसच्या इतिहासात १०० टक्के कार्यकारिणीने राजीनामा देण्याची पहिलीच घटना असल्याचा दावा त्यांनी केला.
पुढील दिशा दसर्‍याआधी
कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना सहा महिन्यांत मला मुख्यमंत्री करणार, असे आश्‍वासन दिल्लीतील नेत्यांनी दिले होते. मात्र, हे आश्‍वासन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाळले नाही. चारवेळा माझे मुख्यमंत्रिपद हुकले असा आरोप राणे यांनी केला. पुढील दिशा कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवणार आहे. नवरात्रीत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून दसर्‍याच्या आधी पुढची वाटचाल काय असेल, हे जाहीर करणार आहे, असे राणे यांनी सांगितले.
अशोक चव्हाणांवर आरोप
राणेंना अडचण निर्माण कशी करायची, याचाच उद्योग अशोक चव्हाण यांनी नेहमी केला. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आपले नाव असताना मला डावलून चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली. विधानपरिषदेची उमेदवारी मिळू नये म्हणून चव्हाण दिल्लीत ठाण मांडून होते. मात्र, राहुल गांधी यांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचा गौप्यस्फोट करीत राणे यांनी चव्हाण यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. अशोक चव्हाण कॉंग्रेस पक्ष संपवण्यासाठीच काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेला खिंडार पाडणार
राज्यातील ६० टक्के कॉंग्रेस कॉंग्रेस आपल्यासोबत असल्याचा दावा करीत शिवसेनेचे २७ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे राणे म्हणाले. कॉंग्रेस तसेच शिवसेना या दोन्ही पक्षांना खिंडार पाडणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, कॉंग्रेसचे आमदार असलेले नारायण राणे यांचे कनिष्ठ पुत्र नितेश यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत राणे यांनीही पत्रकार परिषदेत कोणतेच स्पष्ट उत्तर दिलेले नाही.