नाफ्ताची टँकरने वाहतूक नाही

0
213

>> मुख्यमंत्र्यांचे कॉंग्रेस शिष्टमंडळाला आश्‍वासन

वास्को येथील नाफ्ताप्रकरणी नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. नाफ्ताची रस्त्यावरून टँकरच्या माध्यमातून वाहतूक केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली. दरम्यान, नाफ्तावाहू नू शी नलिनी जहाज प्रकरणी सचिव शिपिंग यांच्यामार्फत चौकशीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच, एमपीटीच्या अध्यक्षाच्याविरोधात कारवाईबाबत येत्या १५ दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पर्वरीतील सचिवालयात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळाने भेट घेऊन वास्को येथील नाफ्तावाहू नलिनी जहाज आणि साठवून ठेवलेल्या नाफ्ताप्रकरणी एक निवेदन सादर केले आहे. नाफ्तावाहू जहाज प्रकरणी एमपीटीच्या अध्यक्षांविरोधात एमआयआर दाखल करण्याची जाहीर करण्यात आले आहे. या प्रकरणी त्वरित कृती करावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांचा वेळ मागून घेतला आहे. विरोधी पक्षनेते कामत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, संकल्प आमोणकर, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो व इतरांचा समावेश होता.

सखोल चौकशीची मागणी
कॉंग्रेस पक्षाने नाफ्तावाहू नलिनी जहाज प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करणारे एक निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने नाफ्तावाहू जहाज प्रकरणी डीजी शिपिंग यांच्यामार्फत करण्यात येणार्‍या चौकशीबाबत संशय व्यक्त केला आहे. नाफ्तावाहू जहाज गोव्यात आणण्यात डीजी शिपिंग यांचा समावेश असल्याने या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच साठवून ठेवलेल्या नाफ्ताची टँकरच्या माध्यमातून रस्त्यावरून वाहतूक करू नये, अशी मागणी केली. नाफ्ताची वाहतूक जहाजाच्या माध्यमातून करण्यावर भर दिला जात आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिष्टमंडळाला दिली.