म्हादई, खाणप्रश्‍नी मुख्यमंत्री दिल्लीला

0
116

>> मंत्री प्रकाश जावडेकरसोबत करणार चर्चा

म्हादई, खाण प्रश्‍न तसेच केंद्रीय वित्त मंत्र्यांनी आयोजित अर्थसंकल्प पूर्ण बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नवी दिल्लीला काल रवाना झाले आहेत.

राज्यातील म्हादई प्रश्‍न गेल्या कित्येक दिवसापासून चर्चेचा विषय बनला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर म्हादईचा प्रश्‍न मांडलेला आहे. त्यानंतर म्हादई प्रश्‍नी दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. तथापि, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून कर्नाटकला कळसा, भांडुरा प्रकल्पासंबंधी देण्यात आलेल्या पत्राबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यात म्हादईच्या रक्षणार्थ आंदोलन करणार्‍यांनी उद्या गुरूवार दि. १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्तीदिनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा दिलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन कर्नाटकला दिलेल्या पत्राबाबत चर्चा करणार आहे. मंत्री जावडेकर यांनी कर्नाटकला दिलेल्या पत्राबाबत १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

राज्यातील खाण प्रश्‍न प्रलंबित आहे. येत्या डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत खाण व्यवसाय सुरू करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत खाण बंदीच्या विषयावर संबंधितांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. आज बुधवार दि. १८ रोजी केंद्रीय वित्तमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे अर्थसंकल्प पूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. सावंत उपस्थित राहतील.

खाणप्रकरणी याचिका तहकूब
सर्वोच्च न्यायालयातील गोव्यातील खाण प्रकरणाबाबतची याचिका तहकूब करण्यात आली आहे. गोव्यातील खाण प्रकरणी सेसा गोवा कंपनीची एक याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी येणार होती. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील याचिकांमुळे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार्‍या सर्व याचिकांची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. यावर आता जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सुनावणी घेतली जाणार आहे.