नाकाचा घोळणा फुटणे.. उन्हाळ्यातील समस्या

0
274
  • – डॉ. मनाली महेश पवार

नाकातून रक्त येणे म्हणजे नाकाचा घोळणा फुटणे होय. वातावरणाचे तापमान अचानक वाढणे किंवा कमी होणे, हवा अचानक खूप कोरडी होणे अशा कारणांनी नाकातून रक्त येते. नाकातून रक्त येणे ही फार गंभीर समस्या नाही. पण असे वारंवार व्हायला लागले तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काहीच कारण नसताना एखाद्याच्या नाकातून भळाभळा रक्त वाहू लागले, अशा प्रकारचा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आलाच असेल. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं दिवसभर उन्हात खेळत आहेत व अचानक भर दुपारी मुलाच्या नाकातून रक्त आलं असंही ऐकलं असेल. एखादा मस्त एसीमध्ये काम करत असतो, वातावरण एवढं थंड होतं की नाकातून रक्त वाहू लागलं हेही समजत नाही. अगदी रुमाल तोंडाला लावल्यावर रुमालाला रक्त लागलं तेव्हा समजलं असंही ऐकिवात असेल. बरे हे रक्त लालभडक व पातळ असते त्यामुळे सगळे घाबरून जातात.

नाकातून रक्त येणे म्हणजे नाकाचा घोळणा फुटणे किंवा आयुर्वेदशास्त्रानुसार ‘नासागत रक्तपित्त’ होय. वातावरणाचे तापमान अचानक वाढणे किंवा कमी होणे, हवा अचानक खूप कोरडी होणे अशा कारणांनी नाकातून रक्त येते. लहान मुलांमध्ये किंवा प्रौढ व्यक्तीमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसते. बर्‍याच वेळा ही समस्या उन्हाळ्यात जास्त प्रमाणात आढळते. नाकातून रक्त येणे ही फार गंभीर समस्या नाही. असे रक्त काही मिनिटात थांबते. पण असे वारंवार व्हायला लागले तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

आयुर्वेदशास्त्राप्रमाणे शरीरातील बाह्यस्रोतसांतून जेव्हा आघातादी कारणाशिवाय रक्तस्राव होऊ लागतो तेव्हा त्यास ‘रक्तपित्त’ असे म्हटले जाते. जेव्हा हा रक्तस्राव नाकातून होतो तेव्हा त्यास ‘नासागत रक्तपित्त’ असे म्हणतात. यालाच ‘घोळणा फुटणे’ असेही म्हटले जाते. यात प्रकुपित झालेल्या पित्ताने रक्ताची दुष्टी होते म्हणून याला ‘रक्तपित्त’ असे म्हणतात.

नाकातील घोळणा फुटण्याची कारणे…
उन्हाळ्यात पित्तकर, पित्तप्रकोपक आहारविहार रक्तपित्तास कारणीभूत ठरतो.

  • उष्ण, तीक्ष्ण, तिखट, विदाही, अम्ल, क्षारयुक्त पदार्थ यांचे अधिक प्रमाणात सेवन करणे हे घोळणा फुटण्याचे मुख्य कारण आहे.
    -आतपसेवा (उन्हात जास्त वेळ राहणे), अग्निसेवा (आगीजवळ जास्त वेळ काम करणे) हीसुद्धा घोळणा फुटण्याची मुख्य कारणे आहेत.
  • पावटा, उडीद, यव, हुलगे यांचे जास्त सेवन.
    दही, दह्यावरचे पाणी, पाणी न घातलेले आबट ताक, आम्लकांजी, डुक्क्र यांचे मांस, शुष्कमांस, मासे यांचे अतिसेवन.
  • मोहरी, लसूण यांचा जास्त वापर.
  • मुळा, शेवग्याच्या भाजीचा अतिरेक.
  • फास्ट फूड, जंक फूड, मसालेदार, चटपटीत खाण्याचा अतिरेक.
    वर सांगितलेल्या या मिथ्या आहारविहाराने पित्त उष्ण व तीक्ष्ण गुणाने वाढते. पित्त व रक्ताच्या प्रमाणात वाढ होते. वाढलेले हे रक्त विदग्ध असते. त्यात मलरूप पित्तही मिसळलेले असते. धातुगत जलीय अंश रक्तात मिसळल्याने रक्ताचे प्रमाण आणखीनच वाढते. रक्ताच्या वाढलेल्या प्रमाणामुळे व पित्ताच्या आधिक्यामुळे रक्तवाहिन्यांतील दाब वाढतो व त्यांना इजा होते. या क्षतातून (जखमेतून) रक्तस्राव होऊ लागतो व हे नाक, कान, डोके यातून बाहेर पडते. यामध्ये साधारणतः कोणत्याही बाह्य आघातसदृश्य कारणांखेरीज शरीरांतर्गत कारणांनी येथे रक्तस्राव सुरू होतो.

आधुनिक शास्त्राप्रमाणे

  • नाकात जखम झाल्यामुळे.
  • सायनसचा त्रास असल्यामुळे.
  • एलर्जीमुळे.
  • हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यामुळे.
  • ऍस्पिरिनसारख्या औषधांमुळे रक्त पातळ होऊन नाकातून बाहेर पडते.
  • याचबरोबर उन्हाळ्यात हवेतील उष्णतेमुळे नाकातील त्वचा ड्राय होऊन घोळणा फुटण्याचा त्रास जास्त होतो.
  • सतत एसीचा वापर केल्याने हवा कोरडी होऊन त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.

नाकाच्या आतल्या बाजूला एक विशिष्ट प्रकारची कातडी असते. या पातळ त्वचेला ‘म्युकोझा’ असं म्हणतात. म्युकोझा नरम (सॉफ्ट) असल्याने त्याला थोडासा जरी धक्का लागला किंवा जखम झाली तरी लगेच त्यातून रक्त यायला सुरुवात होऊ शकते.
आपलं नाक नेहमी थोडं ओलसर राहावं यासाठी नाकात निसर्गतःच पातळ पदार्थ बनण्याची व्यवस्था आहे. उन्हाळ्यात मात्र नाकातला ओलसरपणा कमी होऊन नाक आतून कोरडं पडतं. नाकाच्या आतल्या त्वचेला अगदी लागून रक्तवहिन्या पसरलेल्या असतात. त्यामुळे ही त्वचा कोरडी झालेली असताना चुकून नाक-तोंड कुठे आपटले गेले किंवा कुणाला नाकात बोट घालून नाक कोरण्याची सवय असेल तर त्यामुळेही रक्तवाहिनी पसरलेल्या असतात त्या फुटतात आणि रक्त येऊ लागते.

घोळणा फुटण्याची पूर्वरूपे व लक्षणे

  • अंग दुखणे, थंड खाण्याची इच्छा होणे, तोंडातून वाफा निघाल्यासारखे वाटणे, उलटी होणे, श्‍वासाला रक्ताचा वास येणे, खोकला, दमा, भ्रम, क्लम, स्वरक्षय, तोंडाला गंजलेल्या लोखंडासारखा अम्लगंध येणे, शेंबुड लाल रंगाचे होणे वगैरे साधारण अशा प्रकारची पूर्वरूपे (व्याधी उत्पन्न किंवा लक्षणे दिसण्यापूर्वी काही सूचक लक्षणे दिसणे) दिसतात.
  • नाकातून रक्तस्राव होणे हे यातील प्रत्यात्मिक असे लक्षण आहे.

नासागत रक्तपित्ताची चिकित्सा

  • रोगी बलवान असल्यास शोधनोपक्रम करावेत. म्हणजेच उर्ध्वग रक्तपित्ता विरेचन द्यावे. विरेचनासाठी आरग्वध, आमलकी, हरीतकी, निशोत्तर, द्राक्षा, यष्टीमधू आदी द्रव्याचा उपयोग करावा.
  • यामध्ये रक्तासारखा महत्त्वाचा धातू शरीराबाहेर जात असला तरी तो दुष्ट व प्रमाणतः वाढलेला असा रक्तधातू असतो. रोगी बलवान असल्यास सुरुवातीलाच स्तंभन करू नये. स्तंभन (थांबवणारी औषधे) दिल्यास पूतिनस्थसारखी लक्षणे उत्पन्न होतात.
  • प्रतिमार्गग शोधन दिल्यानंतर किंवा रोगी दुर्बल असल्यास सुरुवातीपासूनच शमन उपचार करावेत. यासाठी कडू-कषाय रसांची, शीतवीर्य असणारी अशी औषधे वापरावीत.
  • फलरसांचे तर्पण द्यावे. तर्पणासाठी खजूर, मनुका, यष्टिमधू यांनी सिद्ध केलेले शर्करायुक्त जल गार करून द्यावे.
  • डाळिंब व आवळा यांनी सिद्ध केलेले तर्पणही लाभदायी ठरते.
  • शयनोपचारामध्ये अडुळसा हे उत्तम औषध आहे.
  • वाळा, चंदन, हरिद्रा, दारुहरिद्रा, जेष्ठमध, नागरमोथा, मंजिष्ठा, गैरीक, प्रवाळ, पद्मकाष्ठ यांसारखी अन्य शीतवीर्यात्मक तिक्तरसाची व पित्तघ्न औषधे वापरली जातात.
  • रक्तस्तंभनाचा विचार करता वड, ऊंबर, जांभूळ यांचा साली, मोचरस, आंब्याची कोपी इत्यादी औषधे उपयुक्त ठरतात.
  • नस्य विशेष लाभदायी ठरते. पद्मकादि तैल, दुर्वास्वरस, शर्कराजल ही नस्यासाठी उपयुक्त ठरणारी महत्त्वाची द्रव्ये आहेत.
  • खारकेचे चूर्ण तुपातून घेणे.
  • उशिरासव दोन चमचे व समभाग पाणी दोन वेळा घेणे.
  • लघुसुतशेखर एक एक गोळी दोन वेळा घेणे.
  • कांदा फाडून लावावा.
  • थंड दूध किंवा डाळिंबाचा रस प्यायला द्यावा. वारंवार तक्रार असल्यास वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.

घोळणा फुटल्यावर उपचार

  • थंड पाण्याची धार डोक्यावर सोडा.
  • नाकातून रक्त येऊ लागल्यावर तोंडाने श्‍वास घेणे सुरू करा.
  • कांदा कापून नाकाजवळ धरल्यानेही फायदा होईल.
  • नाकातून रक्त येऊ लागल्यास डोके पुढच्या बाजूला वाकवा.
  • तुरही पाण्यात उगाळून नाकावर लावल्याने नाकातून रक्त येणे थांबते.
  • बर्फ कपड्यात गुंडाळून नाकावर ठेवल्याने फायदा होतो.
    नाकातून रक्त येणार्‍या व्यक्तीने सर्वप्रथम मान वर करून आडवे पडावे आणि रक्त येत असलेल्या ठिकाणी दाब द्यावा.
  • पेट्रोलियम जेली किंवा एखादे क्रिम लावावे.
  • रक्तस्राव थांबविण्याकरिता दूर्वांचा रस किंवा कांद्याचा रस दोन्ही नाकपुडीत सोडणे ही लगेच फलदायी चिकित्सा आहे.
  • अडुळसा पानांचा रस साखर व मद्यासह पोटातून घेतल्यास नासागत रक्तस्रावावर फायदा होतो.
  • आहारामध्ये रोज सकाळी १ चमचा गुलकंद किंवा मोरावला खावा.
  • काळ्या मनुका किंवा खजुर भिजवलेले पाणी प्यावे.
  • उसाचा रस प्यावा.
  • लोणी व साखर खावी.
  • साळीच्या लाह्यांचे भरडचूर्ण मध व तूप घालून खावे.
  • वाळ्याचे सरबत प्यावे.
  • याशिवाय जुना तांदूळ, मूग, तूप, दूध, पडवळ, डाळींब, आवळा, कोहळा, नारळ, खडीसाखर, लोणी या गोष्टी आहारात नक्की घ्याव्यात.
    आहारात कुळीथ, गुळा, तिळ, उडीद, मोहरा, दही, लसूण, अतितिखट, आंबट-खाट्ट पदार्थ टाळावेत.
    ज्यांना हा त्रास वारंवार होत असेल त्यांनी पथ्यपालन करावे. अतिश्रमाची कामे, उन्हात फिरणे टाळावे, स्टिम घेणे टाळावे, धूम्रपान, मद्यपान प्रकर्षाने टाळावे.
    घोळणा फुटल्यावर प्रथमोपचार केल्यावर रक्त थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.