आसाममधील पुराचा २ लाख लोकांना फटका

0
31

>> अनेक भागात अतिवृष्टी, पूर अन् भूस्खलन; काही भागांचा संपर्क तुटला

देशात एकीकडे उष्णतेने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक भाग अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत. आसाममधील २४ जिल्ह्यांतील सुमारे २ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. भूस्खलन झाल्यामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटला आहे. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरच्या काही भागांत रस्ते आणि रेल्वे संपर्क विस्कळीत झाला आहे.

मंगळवारी आसाम आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, भूस्खलनामुळे अनेक ठिकाणे प्रभावित झाली आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनात एका महिलेसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झाले आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये २ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. होजाईमधील ७८,१५७ आणि कछारमधील ५१,३५७ लोकांना पुरामुळे प्रभावित झाले आहेत.

दक्षिण आसाम, त्रिपुरा आणि मिझोरामसाठीचे रेल्वे मार्ग गेल्या २ दिवसांपासून बंद आहेत. गुवाहाटीतील बहुतांश भागात चार-पाच दिवसांपासून पाणी साचले आहे. शुक्रवारपासून राज्यभरात पाऊस पडत आहे. परिणामी शहरातील रस्त्यांवर चिखल साचल्याने अडचणी वाढल्या आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवस या प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच हवामान खात्याने बुधवारी आसाममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.