नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याची सुप्त इच्छा असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे अखेर स्वप्न पूर्ण झाले आहे. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना मिळालेला शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना देऊ केला आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत नोबेल पुरस्कारासोबत येणारे सुवर्णपदकही त्यांना देण्यात आले. गेल्या महिन्यात मचाडो यांना हा पुरस्कार मिळाला होता. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मारिया मचाडो यांनी माझ्या कामासाठी मला तिचा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला. परस्पर आदराचे हे अद्भूत उदाहरण आहे. धन्यवाद मारिया! तर, मचाडो यांनी ही बैठक उत्कृष्ट असल्याचे वर्णन केले; परंतु अधिक तपशील दिले नाहीत. नोबेल शांतता पुरस्कार कोणालाही हस्तांतरित करता येत नाही किंवा काढूनही घेतला जाऊ शकत नाही, असे नॉर्वेजिअन नोबेल संस्थेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.