नवी समीकरणे

0
46

महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये राज्यसभेच्या सोळा जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काही सदस्यांनी ज्या प्रकारे दुसर्‍या पक्षाच्या उमेदवारासाठी मतदान केले, त्यातून निकाल तर बदललेच, परंतु त्याहीपेक्षा विविध राजकीय पक्षांमधील समीकरणे त्यामुळे बदललेली आहेत आणि येणार्‍या काळामध्येही त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे समर्थन करणार्‍या छोट्या पक्षांनी व अपक्षांनी केलेल्या क्रॉस वोटिंगमुळे शिवसेनेवर भाजपाने मात केली. राजस्थानात भाजपच्या शोभारानी कुशवाह यांनी, हरियाणात कॉंग्रेसच्या कुलदीप बिश्‍नोईंनी, तर कर्नाटकमध्ये जेडीएसच्या श्रीनिवास गौडांनी अन्य पक्षीय उमेदवारांसाठी मतदान करून निकाल आणि राजकीय समीकरणे पालटली. मागील आठवड्यामध्ये अकरा राज्यांत झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, परंतु ह्या चार राज्यांंमध्ये निवडणूक अटळ ठरली होती. त्यामुळे या निवडणुकीतील मतदार असलेल्या आपापल्या आमदारांना हॉटेलांवर नेऊन ठेवण्याची वेळ विविध राजकीय पक्षांवर आली होती. महाराष्ट्रापासून राजस्थानपर्यंत सर्वत्र आमदारांवर कडक नजर ठेवून देखील शेवटी क्रॉस वोटिंग झालेच.
राजस्थानात भाजपच्या मागासवर्गीय नेत्या शोभारानी कुशवाह यांनी आपल्याच पक्षातर्फे उभे राहिलेले ‘झी’समूहाचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा यांना पराभूत करण्यास हातभार लावला. त्यांनी कॉंग्रेसच्या प्रमोद तिवारींना मत दिले. आपल्या निवडणुकीत ‘झी’ च्या वृत्तवाहिन्यांनी आपल्याविरुद्ध बातम्या दिल्या होत्या असे सांगत त्यांनी हा वचपा काढला. सुभाष चंद्रा गेल्या वेळी हरियाणातून अपक्ष राहून राज्यसभेवर पोहोचले होते. यावेळी राजस्थानातून त्यांनी निवडणूक लढवली आणि भाजपचा पाठिंबा असूनही पराभूत झाले. राजस्थानातील या क्रॉस वोटिंगमुळे तेथील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मान अर्थातच ताठ झाली आहे. विशेषतः त्यांच्याच पक्षाचे तरुण तुर्क नेते सचिन पायलट यांनी त्यांच्याविरुद्ध उघडलेली आघाडी लक्षात घेता गेहलोत यांच्या अनुभवी रणनीतीकाराला या राज्यसभा निकालाने त्याची पोचपावती दिली आहे असेच म्हणावे लागेल.
कर्नाटकात चारपैकी तीन जागांवर भाजप लढला व तिन्ही जिंकल्या. ही निवडणूक लक्षात राहील ती जेडीएस उमेदवार श्रीनिवास गौडा यांनी केलेल्या क्रॉस वोटिंगमुळे. कॉंग्रेस आणि जेडीएसदरम्यान त्यामुळे आता दरी निर्माण झाली आहे आणि येत्या सात आठ महिन्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद नक्कीच उमटतील.
हरियाणात कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा फटका राहुल गांधी यांच्या जवळचे नेते अजय माकन यांना बसला आहे. दोन आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे भाजपसमर्थित अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा निवडून येऊ शकले आहेत. क्रॉस वोटिंग करणार्‍यांमध्ये भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिश्‍नोई आहेत. शिवाय भाजपने यावेळी या जाटबहुल राज्यातून दलित आणि ब्राह्मण उमेदवारांना निवडून दिले आहे. हरियाणातील राजकीय समीकरणे त्यामुळे अर्थातच बदलणार आहेत.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चाणक्यनीतीने महाविकास आघाडीतील छोटे पक्ष व अपक्षांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. या छोट्या पक्ष व अपक्षांना आपण कोणाला मत दिले हे जाहीर करण्याची आवश्यकता नसते. परिणामी शिवसेनेने एक जागा या निवडणुकीत गमावली. भाजपला दोन जागा मिळणार हे संख्याबळ पाहता निश्‍चित होते, परंतु शिवसेनेच्या संजय पवार यांच्या पराभवाने एक अतिरिक्त जागा त्यांच्या पदरात पडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांनाही एक जादा मत मिळाल्याचे दिसून आले आहे आणि ते विरोधकांकडून आल्याचे पवार यांनी जाहीर करून टाकले आहे.
या निवडणुकीतून शिवसेनेचे संजय राऊत, भाजपच्या निर्मला सीतारमण, कॉंग्रेसचे जयराम रमेश, रणदीप सूर्जेवाला, मुकुल वासनिक वगैरे मंडळी पुन्हा राज्यसभेवर पोहोचली आहेत. या निवडणुकीतील क्रॉस वोटिंगमधून जी नवी समीकरणे निर्माण झाली आहेत, ती यापुढील विधान परिषद किंवा मुंबई महानगरपालिका व इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीतही कायम राहतील असे दिसते आहे. त्यामुळेच राज्यसभेची ही निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची बनवली होती आणि आपल्या लोकप्रतिनिधींना कडक बंदोबस्तात ठेवून क्रॉस वोटिंग होऊ नये याची खबरदारी घेतली होती. तरीही क्रॉस वोटिंग झालेच. राजकीय घोडेबाजारातूनच हे घडले हे तर स्पष्टच आहे, परंतु दोष कोणी कोणाला द्यायचा? आजच्या राजकारणामध्ये असे प्रकार आता सवयीचे झाले आहेत. साम, दाम, दंड, भेद नीती प्राचीनकाळी वापरली गेली नसेल, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या राजकारणात वापरली जाते एवढे खरे!