नवीन राजभवन उभारणार

0
268

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

राज्यात नवीन राजभवन बांधण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजभवन इमारतीच्या देखभाल बैठकीत बोलताना काल दिली.

नवीन राजभवन बांधण्यासाठी जमीन निश्‍चित करणे, राजभवन संकुलाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्याची सूचना करण्यात आली असून नवीन राजभवनासाठी एप्रिल २०२१ पूर्वी निविदा जारी केली जाऊ शकते, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीत सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आल्तिनो, पणजी येथे आपल्या सरकारी निवासस्थानी घेतलेल्या एका बैठकीत राजभवन इमारतीची देखभाल आणि जीर्णोद्धाराच्या कामाचा आढावा घेतला. दोनापावल येथील राजभवनाची जुनी इमारत भारतीय पुरातन सर्वेक्षण संस्थेने हॅरिटेज इमारत म्हणून घोषित केली आहे. विद्यमान राजभवनाच्या जुन्या इमारतीची वैशिष्ट्यता टिकवून ठेवण्यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भर दिला.

राजभवनासाठी नवीन जागा निश्‍चित करताना इमारत बांधकामाचा सर्व अंगानी विचार करावा. तीन हेलिकॉप्टरच्या लॅडिंगसाठी पुरेशी जागा ठेवण्याची सूचना मुख्य सचिव परिमल राय यांनी केली. विद्यमान राजभवन इमारतीची देखभाल योग्य पद्धतीने केली जाणार असून इमारतीचे पुरातन वैशिष्ट्य जपले जाणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंत्ता उत्तम पार्सेकर यांनी सांगितले. या बैठकीला राज्यपालांचे सचिव रूपेश कुमार ठाकूर (आयएएस), डब्ल्यूआरडीचे प्रमोद बदामी, मर्विन गोम्स यांची उपस्थिती होती.