नवीन मोटर वाहन कायद्याची आजपासून अंमलबजावणी

0
14

>> सुधारित दंडात दहापटीने वाढ

>> २७ वर्षांनंतर दंड शुल्क वाढवले

राज्यात मोटर वाहन कायद्याअंतर्गत सुधारित दंड शुल्काची अंमलबजावणी आज शुक्रवार दि. १ एप्रिल २०२२ पासून केली जाणार आहे. दंड शुल्काची अंमलबजावणी वाहतूक पोलीस आणि वाहतूक खात्याकडून केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर यांनी काल सुधारित दंड शुल्क अंमलबजावणी आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

वाहतूक दंड शुल्कात २७ वर्षांनी वाढ करण्यात आलेली आहे. वर्ष १९९५ मध्ये वाहतूक दंड शुल्कात वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारने वाहतूक नियम उल्लंघनाच्या सुधारित दंड शुल्कात मोठी वाढ केली आहे. या सुधारित दंड शुल्काची अंमलबजावणी सर्वच राज्यांनी सुरू केली होती. तथापि, गोवा सरकारकडून या सुधारित दंड शुल्काची अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेख समितीने गोवा सरकारकडून सुधारित दंड शुल्काची अंमलबजावणी केली जात नसल्याने नापसंती व्यक्त करून अंमलबजावणी न केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने सुधारित दंड शुल्काची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूक खाते आणि पोलिसांकडून वापरण्यात येणार्‍या दंड वसुलीच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रात सुधारित दंड शुल्काची माहिती अपलोड करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक संचालक सातार्डेकर यांनी दिली.

दंडात दसपट वाढ

वाहतूक सुधारित दंडामध्ये दहापट वाढ करण्यात आलेली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या वाहन चालकाला किमान ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. आत्तापर्यंत वाहतूक नियमभंग करणार्‍याला किमान १०० रुपये दंड केला जात होता. विनापरवाना वाहन चालविणार्‍याला १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. वाहन अतिवेगाने चालविणार्‍याला पहिल्या वेळी १ हजार रुपये दंड, हलक्या गाड्या वगळून इतर वाहन चालकाला २ हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

तर, या नियमाचे दुसर्‍यांदा उल्लंघन केल्यास वाहन परवाना निलंबित केला जाणार आहे. धोकादायक आणि बेशिस्तपणे वाहन चालविणार्‍याला १ हजार रुपये दंड, नोंदणी न करता वाहन चालविणार्‍याला २ हजार रुपये दंड, परवाना नसताना वाहन वापरणार्‍याला १० हजार रुपये दंड, वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर न करणार्‍याला १ हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. दुचाकी वाहनावर क्षमतेपेक्षा अधिकजणांना बसविणार्‍याला १ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित केला जाणार आहे. हेल्मेट परिधान न करणार्‍याला १ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित केला जाऊ शकतो. वाहनाचा विमा नसलेल्या वाहन चालकाला २ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.