नवा आत्मविश्वास

0
37

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने भारतीय जनता पक्षाला सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी नवा आत्मविश्वास मिळवून दिला आहे. ज्या उत्तर प्रदेशमध्ये दर पाच वर्षांनी जनता सरकार बदलते, तेथे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर मतदारांनी एवढा भरघोस विश्वास व्यक्त करणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातूनच जात असल्याने त्याचा मोठा फायदा येणार्‍या काळात भाजपाला मिळणार आहे. अँटी इन्कम्बन्सीचा सामना करीत ही विजयश्रीची माळ भाजपच्या गळ्यात पडलेली आहे ही दुर्लक्षिण्याजोगी बाब नाही.
पाच राज्यांच्या निवडणुकांत कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी झाली. पंजाबसारखे मोठे राज्य कॉंग्रेसच्या हातून अंतर्गत लाथाळ्यांपोटी हकनाक निसटले. गोवा, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब यापैकी कोठेही कॉंग्रेसला चमक दाखवता आलेली नाही. उत्तर प्रदेशसारख्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या आहेत हे लाजीरवाणे आहे. कॉंग्रेसी विचारधारेपासून देशाची जनता दूर दूर चालली आहे हे या सार्‍या पडझडीचे कारण आहे का की, कॉंग्रेसच्या नेतृत्वावरील विश्वास उडाल्याने हे होते आहे? यापैकी दुसरे कारण अधिक वैध वाटते. कॉंग्रेसच्या निर्नायकी स्थितीची आणि धरसोड नेतृत्वाची ही सारी परिणती आहे. गांधी घराण्याच्या पलीकडे पाहण्याची कॉंग्रेसची अजूनही तयारी नाही आणि पक्षाला पूर्णवेळ मेहनती नेतृत्व देण्याची या घराण्याच्या वारसदारांची कुवत दिसत नाही असा हा तिढा आहे. त्यामुळे कितीही लटका आव आणला तरी शेवटी आडात असते तेच पोहर्‍यात जात असते, त्यामुळे कॉंग्रेसचा जोर निमिषार्धात ओसरतो आणि प्रादेशिक नेते तोंडघशी पडतात हेच पुन्हा पुन्हा दिसूनयेते आहे. नेत्यांमागून नेते कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपच्या आश्रयाला जात आहेत. या पक्षाला भवितव्य नाही. त्याला नवसंजीवनी देऊ शकेल असे नेतृत्व दृष्टिपथात नाही ही धारणा आता पक्की होत चालली आहे.
आणखी एक महत्त्वाची घडामोड पाच राज्यांच्या निवडणुकांत घडली आहे ती म्हणजे आम आदमी पक्षाने दिल्लीबाहेर पंजाबमध्ये घसघशीत ९२ जागांनिशी हस्तगत केलेली सत्ता. कॉंग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला खिंडार पाडत आम आदमी पक्ष आता देश दिग्विजयाला निघाला आहे असे दिसते. जे काम तृणमूल कॉंग्रेस करू पाहात आहे, कॉंग्रेसची जागा स्वतः घेऊ पाहात आहे, त्याच मोहिमेवर ‘आप’ निघालेला आहे. ‘एकला चलो रे’ चे धोरण अवलंबत अत्यंत पद्धतशीरपणे आम आदमी पक्षाची वाटचाल सुरू आहे. एकटे पुढे जाण्यात एक मोठा फायदा असतो तो म्हणजे आघाडीतील पक्षांचे जोखड त्यांच्या मानेवर राहात नाही. ‘आप’ ची ही एकला चलो रे ची नीती त्यांच्यासाठी फायद्याची ठरली आहे. गोव्यासारख्या राज्यामध्ये आम आदमी पक्षाने दोन जागा जिंकून आपले खाते खोलताना कॉंग्रेसच्या मतपेढीलाच खिंडार पाडले आहे. त्यामुळे येणार्‍या काळामध्ये देशात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील प्रमुख पक्ष म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘आप’ पद्धतशीर पावले टाकणार का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
भारतीय जनता पक्षाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली घोडदौड अजूनही तेवढ्याच वेगात सुरू आहे याचा निर्वाळा पाच राज्यांच्या निवडणुकांनी दिला आहे. नेतृत्वाप्रती हा जो विश्वास निर्माण व्हावा लागतो तो मोदींच्या नेतृत्वाने निश्‍चितच निर्माण केलेला आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ ही केवळ घोषणा नाही, तर खरोखरच अचाट, अकल्पित अशा गोष्टी करण्याची हिंमत मोदींच्या नेतृत्वामध्ये आहे याचे दाखले काश्मीरचे सामीलीकरण, पाकिस्तानवरील हल्ले, राममंदिराची उभारणी, तिहेरी तलाकचे उच्चाटन अशा धाडसी कामगिरीतून देशाच्या जनतेला मिळाले आहेत. त्यामुळेच मोदींच्या नेतृत्वावरील हा विश्वास दृढ झालेला आहे. पाच राज्यांचे निवडणूक निकाल पाहिले तर त्यामध्ये केवळ मोदींना पाहून स्थानिक नेत्यांच्या अकार्यक्षमतेला नजरेआड करून भाजपाला मत देणारा मतदारही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अर्थात, सर्व काही मोदींच्या भरवशावर ठेवून चालणारे नाही. भारतीय जनता पक्षाने आपल्या राज्यांचा कारभारही सुधारण्याची जरूरी आहे. मोदींच्या कृपेने लाभणारी राजकीय स्थिरता आणि केंद्र सरकारच्या मदतीने साधता येणारा विकास याच्या जोडीने कार्यक्षम जनताभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याचे काम पक्षाच्या राज्य सरकारांनी करायला हवे आणि त्या जोडीनेच पक्षकार्याला आम जनतेशी जोडून घेण्याचे काम स्थानिक पक्षसंघटनेनेही करायला हवे. शेवटी जनताजनार्दनाचा आशीर्वादच गरजेचा असतो!