मगोच्या सरकार सहभागाबाबत निर्णय प्रलंबित

0
11

>> केंद्रीय नेतेच अंतिम निर्णय घेणार; मुख्यमंत्र्यांची माहिती; विधानसभा विसर्जनाचा ठराव संमत

राज्यातील भाजपच्या नवीन सरकारमध्ये मगोला सामावून घ्यायचे की नाही, याबाबत अंतिम निर्णय केंद्रीय नेते घेणार आहेत. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून, स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून काही निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच भाजपचे केंद्रीय निरीक्षक आल्यानंतरच नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच मगो व अपक्षांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र काही भाजप आमदारांनी मगोचा पाठिंबा नको अशी भूमिका घेतली होती. या सार्‍या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, काल मुख्यमंत्र्यांनी मगोला सरकार सहभागी करून घ्यायचे की नाही, याविषयी केंद्रातील नेतेच निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सध्याची विधानसभा सोमवार दि. १४ मार्च २०२२ रोजी विसर्जित करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलेला ठराव सोमवारी राज्यपालांकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील जनतेने आपल्या नेतृत्वाखाली सरकारला तीन वर्षे कार्य करण्याची संधी दिली. या काळात साधनसुविधा विकासाबरोबरच मनुष्य विकासाच्या योजना राबविण्यात आल्या. गोवा मुक्तीची ६० वर्षे साजरी करण्याची संधी प्राप्त झाली. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा हा कार्यक्रम गावागावात पोचविण्याची संधी मिळाली. राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करणारा ठराव बैठकीत संमत करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

विधिमंडळ गटनेता निवडीकडे सर्वांचे लक्ष

भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर भाजपचे आमदार विश्‍वजीत राणे आणि माविन गुदिन्हो नेतेपदाच्या शर्यतीत आहेत.