नवप्रभेच्या दीपावली अंकात दर्जेदार मजकुराची मेजवानी

0
169

नवप्रभेच्या सन २०१९ च्या दीपावली अंकामध्ये तब्बल २५६ पानांमध्ये भरगच्च वाचनीय व दर्जेदार मजकूर देण्यात आला असून श्री. उत्पल पर्रीकर यांनी आपले वडील व गोव्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या अनेक ह्रद्य आठवणींना दिलेला विस्तृत उजाळा हे या अंकाचे ठळक वैशिष्ट्य आहे. नवप्रभाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने गोव्याच्या साहित्य, संगीत, नाट्य, कला व सामाजिक क्षेत्रातील ५० मान्यवर दिवंगत व्यक्तिमत्त्वांची संपूर्ण व्यक्तिचित्रे डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी लिहिली असून तेही या अंकाचे वैशिष्ट्य आहे.

त्याच बरोबर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावरील गोव्याचे माजी माहिती व प्रसिद्धी संचालक रमेशचंद्र जतकर यांचा आठवणीपर लेख, गोव्याच्या आद्य स्त्री नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्यावरील जनार्दन वेर्लेकर यांचा लेख, गोवा हिंदू असोसिएशनच्या शताब्दीनिमित्त तिच्या कार्याचा आढावा घेणारा रामनाथ न पै रायकर यांचा लेख व त्या संस्थेचे अध्वर्यू रामकृष्ण नायक यांची मुलाखत, कॉंग्रेसच्या भवितव्याची चर्चा करणारा परिसंवाद, ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलावंत भारत गणेशपुरे, सागर कारंडे, तसेच अतुल परचुरे यांचे लेख, पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्तचा सचिन कांदोळकर यांचा लेख, दत्ता भि. नाईक यांचा पाकव्याप्त काश्मीरसंबंधीचा दीर्घलेख, कोकणी व मराठी साहित्याच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेणारे अशोक नाईक तुयेकर आणि दिलीप बोरकर यांचे लेख, राष्ट्रवादी वृत्तीचे गोमंतकीय इंग्रजी कवी आर्मांद मिनेझिस यांच्यावरील माधव बोरकर यांचा लेख, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे यांच्या गिर्यारोहणातील थरारक आठवणी, लोककलेचे अभ्यासक विनायक खेडेकर यांचा ‘सांस्कृतिक प्रदूषणाच्या विळख्यात’ हा परखड लेख, तसेच मान्यवरांच्या कथा कविता असा भरगच्च मजकूर या विशेषांकात देण्यात आलेला आहे. मासिकाच्या आकारातील या २५६ पानी विशेषांकाचे मूल्य फक्त ५० रुपये आहे. कालपासून तो सर्व प्रमुख वृत्तपत्र वितरकांकडे वितरीत करण्यात आला.