>> केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना दृढ विश्वास
>> लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर भाजपची चर्चा
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजप व मित्रपक्ष आमदारांच्या संयुक्त बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर काल चर्चा करण्यात आली आहे. गोव्यातील भाजपच्या दोन्ही जागांसाठी उमेदवारांची निवड भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून केली जाणार आहे. गोव्यातील मतदार भाजपच्या उमेदवारांना विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा संधी देतील, असा विश्वास केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मगोपचे ज्येष्ठ नेेते वीज मंत्री सुदिन ढवळीकर व इतरांची उपस्थिती होती.
भाजप पक्षाकडून लोकशाही पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाते. केंद्रीय निवडणूक समितीकडून योग्य वेळी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांतील कार्यकाळात विकासाच्या मुद्यावर भर देण्यात आला. कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले.
गोव्यातील दोन्ही जागा
भाजप जिंकणार : मुख्यमंत्री
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील. राज्यात भाजपा आणि मित्र पक्षांचे मिळून 33 आमदार आहेत. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीला 160 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात जिंकण्यासाठी काय करावे लागेल याबाबत चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्य सरकार अंतोदय, ग्रामोदय आणि सर्वोदय या तत्त्वांवर काम करीत आहे. राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध सरकारी योजना पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यातील 99 टक्के लोकांपर्यंत केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजना पोहोचल्या आहेत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
पहिले डिजिटल राज्य
बनविण्यासाठी प्रयत्न
गोवा हे देशातील पहिले डिजिटल राज्य बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र सरकारकडे निधी मागितला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.