सरस्वती पूजनास परवानगी नाकारणाऱ्या प्राचार्यांची बदली

0
21

पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालयात सरस्वती पूजनास परवानगी न देणारे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. फिलिप रॉड्रिग्ज इमेलो यांची तडकाफडकी काल बदली करण्यात आली. या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य म्हणून प्रविणा केरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उच्च शिक्षण खात्याने याबाबत बुधवारी आदेश जारी केला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने या सरकारी महाविद्यालयात सरस्वती पूजनासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र सरस्वती पूजनास परवानगी न दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. परवानगी नाकारल्यानंतरही 21 ऑक्टोबरला विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजनाचा कार्यक्रम साजरा केला.
राज्य सरकारने या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत प्रभारी प्राचार्य डॉ. फिलिप ईमेलो यांच्या तडकाफडकी बदलीचा आदेश बुधवारी जारी केला. त्यांची सेंट झेवियर महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे.