नदीचे सूक्त

0
251
  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

नदी मुक्त मानाने, मुक्त हस्ताने दान देत असते. पण घेणार्‍याने ते किती घ्यावे, कसे घ्यावे याचे भान ठेवायला हवे. नदीच्या वाहत्या प्रवाहात जी अंतर्मुखता आहे, ती नको का आपण घ्यायला? सारेच सुख ओरबाडून घेतले तर शेवट काय होईल?

जलतत्त्वामध्ये महासागर, समुद्र यांच्याइतकेच नदीला महत्त्व आहे. भौतिकदृष्ट्या तसेच सांस्कृतिक संदर्भमूल्य असलेली नदी नेहमीच गौरविली गेली आहे. नदी म्हणजे गती. नदी म्हणजे प्रवाह. नदी म्हणजे सातत्य. नदी म्हणजे मानवाला सुखी अन् समृद्ध जीवन जगण्यासाठी लाभलेले दृढ आश्‍वासन. आपल्या दोन्ही काठांवरील माणसांचे जीवन सुखमय करण्यासाठी अहर्निश खाचाखळग्यांतून अथकपणे वाहणारी ही जलवाहिनी. तितकीच जीवनदायिनी. पर्वतराजींतून, डोंगरमाथ्यावरून, निरूंद पट्‌ट्यातून, दर्‍याखोर्‍यांतून वाहन येताना कधी बर्फाचे स्तर घेऊन, कधी पावसाळ्यात रौद्र रूप धारण करून, तर कधी उन्हातान्हाचा ताप सहन करीत ही मनस्विनी सागरकिनारा गाठण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असते. उगमापासून संगमापर्यंत तिला अनेकविध वळणे आणि विविध वाकणे. निसर्गसृष्टी तिला सुशोभित करते की ती सृष्टीला सुंदरतम् करते? काहीही असो. नदी असलेल्या मोठ्या भूप्रदेशाला या निसर्गोत्पन्न जलप्रवाहामुळे अनोखे सौंदर्य प्राप्त होते हे निर्विवाद.
नदीला नदीपण केव्हा आणि कसे प्राप्त होते? सर्व प्रकारच्या जलस्रोतांचा प्रारंभ कोठून होतो? ती होते त्या त्या खोर्‍यांत होणार्‍या वृष्टीमुळे. ‘नदी’ या संज्ञेत मुख्य नदी, तिला येऊन मिळणार्‍या उपनद्या आणि उगमप्रवाह यांची एकत्रित गुंफण असते. खडक, माती किंवा वनस्पती यांनी आच्छादलेल्या भूभागावर पडलेले पाणी आणि हिमवृष्टीनंतर बर्फ वितळून झालेले पाणी भूपृष्ठावरून प्रवाहित होते. कारण प्रवाहित्व हा पाण्याचा गुणधर्म आहे. थोडेफार पाणी जमिनीत मुरून जमिनीखालून वाहू लागते. नदीचे उगमप्रवाह झर्‍यांतून, दलदलींतून, सरोवरांतून किंवा खोर्‍याच्या उंच भागांतील छोट्या छोट्या ओढ्या-ओहोळांतून सुरू होतात. हे मार्ग पाण्याच्या प्रवाहाच्या जोरकसपणामुळे खोल-खोल होत जातात. या ओहोळास मार्ग सापडतो. त्यांचे निर्झर-ओढे निर्माण होतात. पात्र वाढत जाते. नदी आकारास येते. नदीच्या दोन्ही काठांवरील उंच प्रदेश, त्यामधून वाहणारे नदीपात्र, नदीपात्राला लाभलेले वळण आणि सखल प्रदेशाकडे तिचे विस्तारत जाणे हा नदीचा अखंडित प्रवास आहे. ही सारीच दृश्ये नेत्रनिर्वाण देणारी आहेत.

नदी ही अतिशय व्यापक अर्थाची संज्ञा आहे. ओहोळ, निर्झर, ओढा, उपनदी, नदी आणि नद ही जलप्रवाहांच्या वाढत्या आकारमानानुसार प्राप्त झालेली नावे आहेत. सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि शोण या मोठ्या नद्यांना ‘नद’ असे संबोधले जाते. गंगा-यमुना या विशाल नद्यांचा दुआब हा प्राचीन भारतातील संस्कृतीचा केंद्रबिंदू होता. सर्व प्रकारच्या विद्या, कला यांचे ते संगमतीर्थ होते. पूर्वी येथे सरस्वती नदी होती. कालांतराने ती लुप्त झाली अशी मिथ्यकथा सांगितली जाते. गंगा नदी ही मूळची स्वर्गातली. सगरपुत्रांनी भगीरथप्रयत्नांनी ती भारतात आणली म्हणून ती भागीरथी असे सांगितले जाते. त्रिवेणी संगमतीर्थाला भारतीय भूमीत किती पावित्र्ययुक्त स्थान होते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पंजाबची भूमी ‘पंच+आप’ म्हणजे पाच नद्यांचा समूह म्हणून ओळखली गेली. झेलम, चिनाब, रावी, सतलज (शतद्रू) आणि बियास (व्यास) या त्या पाच नद्या. बंकीमचंद्रांनी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीतात भारतीय भूमीचा उल्लेख ‘सुजलाम्, सुफलाम् मलयजशीतलाम्, शस्य श्यामलाम्‌|’ असा केलेला आहे. भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या या आणि अनेक नद्यांच्या काठी वसलेल्या विस्तीर्ण भूप्रदेशांमुळे ही धनधान्याची समृद्धी प्राप्त झालेली आहे. भारत हे तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले (कच्छ-सौराष्ट ते पश्‍चिम बंगालपर्यंत) एक द्वीपकल्प आहे आणि अंतर्भाग शेकडो लहान-मोठ्या नद्यांनी व्यापलेला आहे. जगात आढळणारी अनेक निसर्गवैशिष्ट्ये एकट्या भारतीय भूमीत आढळतात. हिमालयाच्या उत्तुंग शिखरांमुळे, विंध्य, सातपुडा, सह्याद्री, अरवली, मलयगिरी या पर्वतांंमुळे उत्तुंग वृक्षराजी आणि विविध प्रकारच्या वनस्पती, वेली-फुले यांचे वैपुल्य येथे आढळते.

नर्मदा, तापी, साबरमती, माही, कृष्णा, गोदावरी, हुगळी, तुंगभद्रा, कावेरी, क्षिप्रा, भीमा, चंबळा, महानदी, घटप्रभा, शरावती, कोयना, पंचगंगा, मलप्रभा, काळी अशा कितीतरी नद्यांचा येथे उल्लेख करावा लागेल. गोव्यातील मांडवी, जुवारी, महादई, कोलवाळ, तेरेखोल, तळपण, गालजीबाग या नद्यांनी येथील जनजीवन समृद्ध केले आहे. नदीच्या पात्रातील जलमार्गामुळे दळणावळणाची सोय सुलभ रीतीने होते. इंधनाची बचत होते.

एकेकाळी नद्यांचा परिसर हा धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध होता. काहींची सांस्कृतिक महत्ताही वाढलेली होती. कृषिसंस्कृतीची नदीकिनार्‍याजवळच्या प्रदेशात वाढ होत होतीच. दरी, मैदान आणि त्रिभुज प्रदेश अशी भूरूपे विशिष्ट रचनेमुळे निर्माण होत आली. अनेक अर्थांनी ही पोषक भूमी होती. नदी उंच पर्वतमाथ्यांवरून सखल प्रदेशात वाहत येत असताना तिच्या प्रवाहाबरोबर गाळ वाहून आणते. कसदार जमीन त्यामुळे तयार होते. अशा ठिकाणी भरपूर प्रमाणात पीक येते. पण आज नदीकाठ हे केवळ शेतीला पोषक क्षेत्र एवढेच मर्यादित स्वरूप राहिलेले नाही.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर नदीपात्रांचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचन, वीजनिर्मिती आणि दळणावळणासाठी होऊ लागला. पूर्वीच्या काळी लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी नदीपात्र सोयीचे ठरत असे. मत्स्यसंवर्धनही तिथे होई.

आपल्या देशात नद्यांच्या पात्रांचा उपयोग बहुउद्देशीय योजनांसाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला. आपल्याकडे पंचवार्षिक योजना कार्यान्वित झाल्या. मोठमोठाली धरणे, बंधारे बांधले गेले. कालवे खणले गेले. काही नद्यांचे प्रवाह दुसरीकडे वळवून त्यांचा विनियोग राष्ट्रीय हितासाठी होऊ लागला. नद्यांच्या खोर्‍यांमध्ये समाविष्ट होणार्‍या प्रदेशांचा पायाभूत विकास साधण्यासाठी शासनाने किंवा निमसरकारी संस्थांनी काही महत्त्वाचे प्रकल्प सुरू केले. देशाच्या आर्थिक विकासाची ही नवी प्रक्रिया होय. नदीकाठच्या परिसरात नगर, बंदरे आणि तीर्थक्षेत्रे निर्माण होतात. हे सारे नदीची उपयुक्तता, ममत्व आणि भक्तिभाव यांवर अवलंबून असते. प्राचीन कालापासून आजमितीपर्यंत नदीचा गौरव माणसाकडून होत आलेला आहे. सर्वच देशांत नद्यांविषयी आदरभाव आणि कृतज्ञताभाव प्रकट होत आलेला आहे. तिला ‘लोकमाता’, ‘जीवनदायिनी’ आणि ‘देवता’ असे संबोधले जाते. नदी दिसताच विनम्रतेने तिला वंदन करून तिच्याकडे नाणी फेकण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गंगा नदीला आपल्या जीवनात किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे काही वेगळे सांगायला नको. लौकिक जगाचा निरोप घेताना गंगातीर्थ प्राशन करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. भारतात आपल्या गावच्या नदीला काय; परंतु ओढ्यालाही ‘गंगा’ असे संबोधण्याचा प्रघात आहे.

आमच्या गावात नदी नाही; परंतु समुद्रसान्निध्य आहे. पण परिसरातील तळपदी ऊर्फ तळपणची नदी आणि गालजीबागची नदी यांविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. कालांतराने काळी नदी आणि तिची विलसिते पाहता आली. चार वर्षे रायबंदरला राहत असताना मांडवीच्या काठाकाठाने सकाळच्या प्रहरी तिचे रंगतरंग अनुभवणे हा माझा आवडता छंद होता. ताळगावच्या पठारावरील चौदा वर्षांत जुवारी नदीच्या समुद्राशी होणार्‍या मीलनक्षेत्राचे निरीक्षण करता आले. ते ते क्षण आनंदाचे झाले. या नदीपात्रांनी आयुष्यात खूप काही दिले.

अनंतकाळ वाहणारी आणि समर्पणशील वृत्तीची नदी ही मानिनी आहे. अनंत दुःखकळा सोसणारी, अश्रू अंतरंगात कोंडून ठेवणारी आणि अभ्यागत दाराशी येताच हसतमुखाने स्वागत करणारी भारतीय स्त्री आणि नदी यांच्यात मला साम्य दिसते. एवढेच नव्हे, धरित्रीचे श्‍वास-निःश्‍वास, हुंडके-उसासे मोकळे होतात, त्याचीच नदी होते असेही वाटते. नदीच्या स्पंदनांतून करुणा वाहते. तिचे सारे पाझर दोन्ही काठांवरच्या माणसांच्या पापण्यांचे काठ पुसण्यासाठी असतात. ती उतट होते. उत्कट होते. तिची उत्कंठा वाढते ती केवळ तिच्या प्रियकराला- सागराला भेटण्यासाठीच नव्हे. आपल्या पात्राच्या सन्निध विराट जनसागर पसरलेला आहे याचे पुरेपूर आत्मभान तिच्याकडे असते. म्हणून तिला पूर येतो तो प्रेमाचा. पण कधीकधी ती रागावते, कातावतेसुद्धा. काठोकाठ भरून वाहणारी नदी आपले दोन्ही काठच उद्ध्वस्त करून टाकते. होत्याचे नव्हते होऊन जाते. हे असे का होते आणि कसे होते? नदीची प्रमाथी शक्ती का उचंबळून येते? अस्मानी-सुलतानी संकटांचा फेरा तर आहेच. नदी मुक्त मानाने, मुक्त हस्ताने दान देत असते. पण घेणार्‍याने ते किती घ्यावे, कसे घ्यावे याचे भान ठेवायला हवे. हा विवेक बाळगायला हवा. नदीच्या वाहत्या प्रवाहात जी अंतर्मुखता आहे, ती नको का आपण घ्यायला? सारेच सुख ओरबाडून घेतले तर शेवट काय होईल? ज्या निसर्गाने नदी निर्माण केली, तो समलय सांभाळणारा आहे. आणि आपण…