नगर नियोजन मंडळाची १६ रोजी पीडीएबाबत बैठक

0
105

नगरनियोजन मंडळाच्या १६ मे २०१८ रोजी होणार्‍या बैठकीत ग्रेटर पणजी पीडीएतून गावे वगळण्यावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी मार्च महिन्यात गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ग्रेटर पणजी पीडीएतून गावे वगळण्याची घोषणा केली आहे. याबाबत अंतिम निर्णय टीसीपी मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे, असे स्पष्ट केले होते. परंतु, अद्यापपर्यंत गावे वगळण्याचा निर्णय टीसीपी बैठकीत घेण्यात आलेला नाही.

ग्रेटर पणजी पीडीएमधून सांताक्रुझ आणि सांत आंद्रे मतदारसंघातील गावे वगळण्याची मागणी केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी गावे वगळण्याच्या मागणीसाठी येथील आझाद मैदानावर जाहीर सभासुध्दा घेण्यात आली आहे. या सभेत नगरनियोजन खात्यावर आरोप करण्यात आल्याने वादाचा विषय बनला होता. आता, या दोन्ही मतदारसंघातील नागरिकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या ८ मेपर्यत मागणी पूर्ण न केल्यास ९ मेपासून आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.