ध्यासपंथी

0
205


देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…
वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती
बा. भ. बोरकर


जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती फारच थोड्या असतात. पण ज्या असतात त्यांना जीवन कळलेले असते, त्याची सार्थकता कशात आहे हे कळलेले असते. गुरुनाथ केळेकर हे असेच एक ध्यासपंथी, ज्यांनी गांधीजींचा अंगभूत साधेपणा आणि नेहरूंची अखंड कार्यमग्नता यांचा आदर्श समोर ठेवून आपली जीवनयात्रा केली. स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील कार्यकर्ता आणि आयुष्याच्या सांध्यपर्वामध्ये ‘मार्ग’ सारख्या रस्ता सुरक्षाविषयक अभिनव चळवळीचा संस्थापक अशी केळेकरांच्या आयुष्याची तीन ठळक पर्वे सांगता येतील. वास्तविक यातील स्वातंत्र्यसैनिकपदाचे बिरूद मिरवत त्यांना उर्वरित आयुष्यभर मानसन्मान मिरवीत राहता आले असते, परंतु स्वातंत्र्याचे ते कार्य सिद्धीस गेल्यावर केळेकर स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी कोकणीची ध्वजा हाती घेतली आणि विघातकतेच्या वाटेला न जाता विधायकतेनेही भाषेचे कार्य पुढे नेता येते हे दाखवून दिले. ते नुसते भाषणांतून भाषाप्रेम आळवत बसले नाहीत, स्वतः आपल्या मुलांना त्यांनी कोकणीतून शिक्षण दिले. त्यासाठी कोकणीतील पहिली खासगी शाळा स्वतःच्या घरी सुरू केली. कोकणीतून ‘नवे गोंय’, ‘मारुती’ सारखी नियतकालिके चालवली, बालवाङ्‌मय निर्माण केले, सोळा हजार शब्दांचा कोकणी शब्दकोश निर्माण केला, कोकणी पुस्तकांच्या विक्रीसाठी साहित्ययात्रा काढल्या, कोकणीतून दैनिक सुरू करण्याचाही खटाटोप केला, परंतु तेथे वाद निर्माण होताच त्यातूनही बाहेर पडले. पेडण्यातील अखिल भारतीय कोकणी लेखक संमेलनातील केळेकरांचे भाषण विधायक भाषाप्रेमाचे एक उत्तम उदाहरण आहे. ‘भाषेचा योग्य उपयोग करता येणे हेच माणूसपणाचे लक्षण आहे’ हे त्यात त्यांनी ठासून सांगितले आहे आणि सभासंमेलने ही लग्नघरे होऊ देऊ नका वा शिमग्याची नाटकेही बनवू नका असेही बजावले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साहित्यिकांना स्वातंत्र्य गरजेचे आहे आणि सत्तेचा सदरा अंगात येईल तेव्हा स्वातंत्र्य गमावून बसाल हा इशारा देण्यासही ते तेव्हा विसरलेले नाहीत. अमेरिकी लेखक रीचर्ड बाकच्या सत्तरच्या दशकात गाजलेल्या ‘जॉनाथन लिव्हिंगस्टोन सीगल’ या इंग्रजी कादंबरीतील उड्डाण करू पाहणार्‍या समुद्रपक्ष्याप्रमाणे तरुणाईला आकाशभरारी घेण्याचे वेड लागावे अशी अपेक्षा केळेकरांनी त्या भाषणात व्यक्त केलेली होती.
याच तरुणाईला सोबत घेऊन त्यांनी ‘मार्ग’ चळवळ गोव्यात उभी केली. ‘मार्ग’ म्हणजे ‘मूव्हमेंट फॉर ऍमिटी टुवर्डस् रोडस् इन गोवा.’ गोव्याच्या रस्तोरस्ती रात्रंदिवस चाललेले अपघाती मृत्यूंचे तांडव पाहून हा ध्यासपंथी अस्वस्थ झाला आणि इतरांनी काही करावे याची वाट न पाहता स्वतःच गावोगावी, शाळा-शाळांमध्ये जात त्यांनी ही अभिनव चळवळ राज्यात उभी केली. रस्ता सुरक्षा, रस्ता स्वच्छता, प्रदूषणमुक्ती, निसर्गजतन आणि रस्त्यावरील सु-वर्तणूक हे त्यांच्या ‘मार्ग’ चळवळीचे पंचशील आहे. शाळकरी मुलांना रस्तासंस्कृती शिकवली तर ती घरोघरी जाईल हे सूत्र धरून केळेकरांनी हजारो मुलांपर्यंत हा विचार पोहोचवला. एकेकाळी इथे राज्यपाल असलेल्या प्रतापसिंग गिल यांनी सततच्या अपघाती मृत्युंमुळे ज्या राज्याचा उल्लेख ‘किलर स्टेट’ असा केला होता, त्या गोव्याला आजही ‘मार्ग’सारख्या उपक्रमांची किती गरज आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गोव्यातील तरुणांपाशी असलेल्या दुचाक्या ह्या आत्मघाती ‘एके – ४७’ आहेत असे केळेकर नवप्रभेत एकदा आले असता म्हणाले होते. त्यांचे येणे नेहमीच प्रसन्नतेचा शिडकावा करीत येत असे. आपल्या नवनव्या संकल्पांविषयी ते सांगत असत. ‘जीवनायन’ नावाच्या एका नव्या उपक्रमाचे सूतोवाच त्यांनी नुकतेच केले होते.
केळेकरांनी गांधी आणि नेहरूंच्या साहित्यावरील ग्रंथालये उभी केली, गांधीजींचे ‘सत्याचा शोध’ कोकणीत आणले, त्या अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला, अलीकडेच ‘कशे आशिल्ले गांधीजी’ सारखे पुस्तक मुलांसाठी तयार केले हे तर खरेच, परंतु ह्या सांध्यपर्वामध्येही सदैव कार्यशील असलेल्या या व्यक्तीमध्येच गांधीजी आणि नेहरू खर्‍या अर्थाने रुजलेले होते असेच म्हणायला हवे. ‘गांधीजींची मुले’ समाजामध्ये निश्‍चित चांगले बदल घडवतील हा आशावाद आणि उमेद बाळगून हा माणूस अखंड वावरला. आणखी वेळ हाताशी असता तर याहून मोठे संकल्प त्याने सोडले असते आणि समाजातील दात्यांच्या मदतीने पूर्णत्वासही नेले असते. ध्येयनिष्ठ आणि अखंड कार्यशील कृतार्थ जीवनाचे असे उदाहरण आमच्या तरी पाहण्यात अवतीभवती दुसरे नाही. म्हणूनच बोरकरांच्या सुरवातीलाच उद्धृत केलेल्या कवितेच्या पुढच्या ओळीही त्यांना लागू ठरतात –
‘देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके |
चांदणे ज्यातून फाके, शुभ्र पार्‍यासारखे ॥