धेंपो-स्पोर्टिंग लढत रंगणार

0
103

फेडरेशन कप
धेंपो स्पोर्टंस क्लब आणिस स्पोर्टिंग क्लब दी गोवा या तूल्यबळ स्थानिक प्रतिस्पर्ध्यांमधील ३६व्या फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेतील महत्वपूर्ण अ गट सामना आज येथील नेहरू स्टेडियमवर विद्युतझोतात होईल.पहिल्या सामन्यात आयएसएल स्टार रोमिओ फर्नांडिसने नोंदलेल्या गोलवर धेंपोने बलाढ्य ईस्ट बंगालवर मात केली असून हा संवेग जारी राखण्यास धेंपो क्लब उत्सुक असेल. स्पोर्टिंगला पहिल्या सामन्यात मुंबई एफसीकडून निसटती हार पत्करावी लागलेली असून स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी पुनर्गठीत बनून आपली गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याने लढत अटीतटीची होईल.
उभयतामधील स्थानिक गोवा प्रोफेशनल लीगमधील लढत १-१ अशी गोलबराबेरीत सुटली होती.
पुणे एफसी-मोहन बगान  लढत टिळक मैदानावर
दरम्यान, पुणे एफसी आणि मोहन बगानमधील लढत टिळक मैदानावर होईल. नववर्षदिनीची ही ब गट लढत उभय संघासाठी महत्वपूर्ण असून मोहन बगान एका गुणासह तिसर्‍या तर पुणे एफसी तीन गुणासह द्वितीय क्रमावर आहे.
भूतान येथे हल्लीच झालेल्या किंग्ज कप स्पर्धेत पुणे एफसीने सडन डेथ टायब्रेकरमध्ये ७-६ असा थरारक विजय मिळविला होता. पुणे एफसीने या मोसमात नऊ स्पर्धात्मक सामने जिंकले असून ऑक्टोबर २०१४नंतरचा आपला १२ सामन्यातील दहावा विजय नोंदण्यास उत्सुक असेल.
पहिल्या सामन्यात प्रारंभिक पिछाडीनंतरही शिलॉंग लाजॉंगवर ३-१ असा विजय मिळविलेल्याग पुणे एफसीकडून आज आणखी एका दमदार कामगिरीची अपेक्षा प्रशिक्षक करिम बेंचारिफा बाळगून आहेत.
पुणे एफसीने पहिल्या सामन्यात दर्शविलेल्या झुंजारवृत्तीवर मी संतुष्ट आहे. गोलपिछाडीनंतर सामन्यावर नियंत्रण मिळविणे अवघड असते पण आमच्या खेळाडूनी ती किमया साधली आणि हा संवेग जारी राखण्याचा खेळाडू प्रयत्न करतील, असे नागोवा मैदानावरील सरावसत्रानंतर पत्रकारांशी बोलताना बेंचारिफा म्हणाले.
पुणे एफसीची मदार कर्णधार अराटा इझुमी, धनपाल गणेश, रयुजी स्युओका आणि ल्युसियानो सोब्रोसां यांच्यावर असेल.
बंगळुरू एफसीला गोलशून्य रोखलेला मोहन बगान संघ आपले आव्हान राखण्याच्या निर्धाराने झुंजणार असल्याने मुकाबला अटीतटीचा होईल. आयएसएलमध्ये खेळलेल्या जेजे लालपेखलुआ, अन्वर अली, बलवंत सिंह आणि प्रितम कोटाल यांच्या आगमनामुळे कोलकाता संघ बलशाली बनलेला असून नवे प्रशिक्षक संजय सेन संघाची आगेकूच जारी राखण्यास उत्सुक असतील.