‘त्या’ तरुणीच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच

0
79

व्हिसेरा तपासणीसाठी हैदराबादला
सोमवारी रात्री कांदोळी येथील सुपरसॉनिक महोत्सव स्थळी संशयास्पदरित्या मरण पावलेली तरुणी ‘मेरी कोम’ चित्रपटातील प्रियांका चोप्राची ‘कॉस्च्युम डिझायनर’ ईशा मंत्री हिची व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्याचे ठरविल्याने शव विच्छेदन अहवाल राखून ठेवला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.शव विच्छेदनानंतर ईशाचा मृतदेह काल तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून अंत्यसंस्कार त्यांनी गोव्यातच करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
‘ईशा’चा मृत्यू अमलीपदार्थांच्या सेवनामुळेच झाल्याचा आरोप कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने परवा मंगळवारी केला होता. त्यामुळे अशा महोत्सवातील अमली पदार्थांचा वापर टाळणे सरकारला शक्य होत नाही अशी चर्चा सर्वत्र आहे.
आम्ही अंतिम अहवालाच्या प्रतीक्षेत : कश्यप
पणजी : ‘‘ईशा मंत्री हिच्या मृत्यूप्रकरणी आम्ही अंतिम अहवालाची वाट पाहत आहोत… त्यांचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांनी आपला अभिप्राय राखून ठेवला आहे.’’ अशी प्रतिक्रिया उत्तर गोवा पोलीस अधीक्षक प्रियांका कश्यप यांनी व्यक्त केली आहे.
प्रियांका कश्यप या ईशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचे तपासकाम करणार्‍या पथकाच्या प्रमुख आहेत. ईशाचे शवविच्छेदन चार डॉक्टरांच्या पथकातर्फे करण्यात आले आहे. तिच्या व्हिसेराचे रासायनिक पृथक्करण व हिस्टो-पॅथॉलॉजिकल परीक्षण झाल्यानंतरच डॉक्टरांचे पथक मृत्यूविषयी अभिप्राय देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.