प्रतापनगर-धारबांदोडा येथे सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये अज्ञात युवतीचा मृतदेह आढळून आला. सकाळी एका स्थानिकाला हा मृतदेह दिसून आल्यानंतर त्याची माहिती त्याने फोंडा पोलिसांना दिली. सदर युवतीचा गळा चिरून खून करण्यात आला असून, तपासणी पथकाच्या अंदाजानुसार ही घटना रविवारी रात्री घडल्याचा संशय आहे. दक्षिण गोव्याचे अधीक्षक टिकम सिंग वर्मा, उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, निरीक्षक विजयनाथ कवळेकर, कुळेचे निरीक्षक राघोबा कामत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच पोलिसांनी श्वानपथकाला पाचरण केले; पण श्वान पथकाकडून खास सुगावा हाती लागू शकला नाही. पोलिसांनी राज्यातील इतर पोलीस स्थानकात युवती बेपत्ता झाल्यासंबधी माहिती गोळा करण्यात सुरुवात केली आहे. पण ही युवती परराज्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जंगलात मिळालेल्या मृतदेहाच्या ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला असता त्या ठिकाणी एक रेल्वे तिकीट सापडले आहे. त्या तिकिटाच्या आधारावर पोलिसांकडून तपास सुरू आहे.