धर्मांतरणप्रश्‍नी संसदेत गदारोळ : कामकाज तहकूब

0
68

पंतप्रधानांनी सभागृहात यावे : थरूर
संसदेचे हिवाळी अधिवेशन संपण्यास फक्त चार सत्रे शिल्लक असताना काल विरोधकांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांमधील कामकाज रोखून धरले. कॉंग्रेसचे शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून त्यांनी (मोदी) लोकसभेत हजेरी लावावी अशी मागणी केली.‘मोदीजींनी लोकसभेत येऊन ‘घर वापसी’ करावी. या अधिवेशनात लोकसभेत आम्ही त्यांना कधी तरीच पाहिले आहे. हे योग्य नाही. त्यांच्यापेक्षा जवाहरलाल नेहरू यांच्याकडे मोठे बहुमत होते. तरीही ते दररोज संसदेत यायचे. म्हणूनच लोकशाहीच्या आदरासाठी मोदींनी लोकसभेत हजेरी लावावी’ अशी टिप्पणी थरूर यांनी लोकसभेत केली.
आग्रा येथील धर्मांतरणाच्या विषयावरील चर्चेवेळी पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत उपस्थित राहून निवेदन करावे या मागणीसाठी विरोधी सदस्यांनी काल जोरदार आग्रह धरला. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरीयन यांनी या प्रश्‍नावर गृहमंत्री राजनाथ सिंग निवेदन करतील, असे स्पष्ट करूनही विरोधकांचे समाधान झाले नाही. या विषयावर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी सदस्यांनी वारंवार सभापतींसमोरील हौद्यात धाव घेणे सुरू ठेवल्याने पुन्हा पुन्हा कामकाज थांबवावे लागले.
भाकप नेते सीताराम येचुरी यांनी सांगितले की जोपर्यंत पंतप्रधान सभागृहात येत नाहीत तोपर्यंत चर्चा होऊ शकणार नाही. ते येतील की नाही ते आम्हाला समजले पाहिजे. बाहेरून काही तरी बोलण्याऐवजी पंतप्रधान सभागृहात आल्यास घटनेप्रमाणे ते योग्य ठरेल.